no images were found
कोल्हापुरात महायुतीचा मेळावा
कोल्हापूर(प्रतिनिधी) : राज्यातील बदलते राजकारण, नव्याने जुळलेली सत्तेची समीकरण आणि नेतेमंडळीच्या भूमिकेत झालेला बदल या साऱ्यांचे प्रतिबिंब कोल्हापुरात महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात उमटले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्षात एकोपा असल्याचे दर्शविण्यासाठी आयोजित मेळावा नेते मंडळींच्या शाब्दिक कोट्या, टोलेबाजींनी गाजली. स्थानिक आणि तालुका पातळीवरील राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणारे नेतेमंडळी या ठिकाणी एकमेकांच्या गळयात गळे घातल्याचे चित्र होते. आतापर्यंतचे पक्षीय मतभेद विसरुन आगामी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करू या असा निर्धारही व्यक्त झाला. विशेषत: पूर्वीश्रमीच्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या व आता भाजपासोबत असलेल्या नेते मंडळीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या कामकाजाचे कौतुक करण्याची चढाओढ पाहावयास मिळाली. व्यासपीठावरील‘तिसरी बार मोदी सरकार’अशा घोषणा दिल्या. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणू असा संकल्पही हात उंचावून केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचाही उल्लेख प्रत्येक नेत्यांनी भाषणात केला. महासैनिक दरबार हॉल येथे झालेला हा मेळावा हाऊसफुल्ल ठरला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, केडीसीसीचे संचालक भैय्या माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, राहुल आवाडे, अशोक माने, माजी नगरसेवक सत्यजित कदम, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, राहुल चिकोडे, विजय जाधव, आरपीआयचे उत्तम कांबळे आदींच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. खासदार मंडलिक व खासदार माने यांनी विविध पक्षांच्या चिन्हांचे उपरणे गळयात घातले होते.
सर्वपक्षीय नेते मंडळी एका व्यासपीठावर आल्यामुळे राजकीय टोलेबाजी होणार ही कार्यकर्त्यांची अपेक्षा रास्त ठरली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, आरपीआयचे उत्तम कांबळे यांच्या भाषणानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली. के. पी यांनी राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत असल्याचे सांगताना ‘महायुतीत आमचा पक्ष छोटा आहे. पक्ष छोटा आहे म्हणून आम्हाला गृहित धरुन कामकाज करू नका. समजून घेऊन पुढे चला.’अशा शब्दांत चिमटा काढला. यानंतर बोलताना शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, ‘तुमचा पक्ष तरी आहे, आम्ही अपक्ष आहोत. आम्हाला बेरजेत तरी धरा. विश्वासात घ्या’अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले. त्यांच्या वक्तव्याने मेळावास्थळी एकच हंशा पिकला. भाषणात के. पी. व यड्रावकर यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी होतील अशी खात्री दिली.
खासदार धनंजय महाडिक यांनी ‘भारत माता की जय, जय श्री राम’अशा घोषणा देत भाषणाला सुरुवात केली. महाडिक व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी केंद्र सरकार व राज्यातील महायुतीच्या सरकारच्या लोकाभिमुख योजनांची प्रभावी मांडणी केली. मोदी यांच्या नेतृत्वाची छाप जगभर उमटवली आहे. भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी मोदी यांना साथ देऊ. जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणू. तिसरी बार मोदी सरकार- अब की बार ४०० पार ” असे महाडिक यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार गतीमान काम करत असल्याचे क्षीरसागर यांनी नमूद केले.
मोदींच्याविषयी आमच्यापेक्षा जास्त माहिती आवाडेंना-सुरेश हाळवणकर
इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विविध कामांची महती सांगितली. जय श्रीराम अशी घोषणाही दिली. त्यांनी भाषणात पंतप्रधान मोदी यांच्या कामकाजाविषयी मुक्तकंठाने कौतुक केले. यानंतर भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी सुरेश हाळवणकर भाषणासाठी उभे राहिले. ते, आमदार आवाडे यांच्याकडे पाहत, ‘पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आम्ही काही आता जास्त बोलणार नाही. कारण आमच्यापेक्षा जास्त माहिती आमदार आवाडे यांना आहे. त्यामुळे आवाडे हेच जास्त बोलतील’अशा शब्दांत कोपरखळी मारली. त्यांच्या या टोलेबाजीने उपस्थितांची हसता हसता पुरेवाट झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनीही तडाखेबंद भाषण केले. ‘कागल तालुक्यातील राजकारण वैयक्तिक मतभेद असले तरी लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून आपण सगळे एकत्र काम करायचे आहे. दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत’
धैर्यशिल मानेंची टोलेबाजी, मुश्रीफांकडून मोदींचे कौतुक
खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे यांनी मोदी सरकारच्या कामगिरीविषयी सांगितले.खासदार धैर्यशील माने यांनी नेते मंडळीकडे पाहत, ‘व्यासपीठावर जोडया लावाव्यात अशी माणसे आहेत. मंडलिक आणि महाडिक, मुश्रीफ आणि घाटगे, आवाडे आणि हाळवणकर अशा जोडया आहेत. के. पी. आणि आबिटकर असा उल्लेख करताच व्यासपीठावर आबिटकर उपस्थित नसल्याचे सांगताच माने यांनी ए.वाय आहेत की असा उल्लेख करताच उपस्थितांनी त्यांच्या हजरजबाबीपणाला टाळयांचा गजर करत दाद दिली. नेते मंडळी एकत्र असली तरी निवडणूकही कार्यकर्त्यांच्य ताकतीवर जिकंली जाते. यासाठी कार्यकर्त्यांचे मनोमिलन महत्वाचे असल्याचे नमूद केले. अध्यक्षस्थानावरुन बोलताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी महायुती एकसंध आहे, कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडावे यासाठी मेळावा आयोजित केला. मेळाव्याला झालेली गर्दी महायुतीची ताकत दर्शविते. लोकसभच्या जिल्ह्यातील दोन्ही जागासह राज्यातील ४८ जागा महायुती जिंकेल.’असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपाचे अशोक देसाई यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादीचे आदिल फरास यांनी आभार मानले