no images were found
जानेवारीअखेरीस भाजप महाराष्ट्रातील चार उमेदवार जाहीर करणार
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने युद्धपातळीवर सुरू केली आहे. जानेवारीअखेर भाजप लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर करणार आहे. नेहमीच पराभव स्वीकारावा लागलेल्या 160 मतदारसंघांत भाजपने मोठा जोर लावला आहे. त्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून भाजपने काम सुरू केले आहे. उमेदवाराला या मतदारसंघात काम करण्यास वेळ मिळण्याच्या उद्देशाने जानेवारीअखेर यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबकी बार ४०० पारची घोषणा केली आहे. त्यानुसार भाजपची यंत्रणा गेल्या वर्षभरापासून या 160 मतदारसंघांत काम करीत आहे. या ठिकाणचे उमेदवारही जवळपास फायनल करण्यात आले असून 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर भाजपच्या निवड समितीची बैठक होणार आहे.
या बैठकीत जानेवारी महिन्याअखेर भाजपचे 160 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बारामती, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर या चार मतदारसंघांचा समावेश असणार आहे. त्यासोबतच राज्यातील अन्य दोन जागांसाठी उमेदवारांची नावे फायनल करण्यात आली असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ, अमित शाह यांचा गांधीनगर मतदारसंघ, नितीन गडकरी यांच्या नागपूर मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे आता भाजप महाराष्ट्रात लोकसभेच्या 30 जागा लढणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने 25 जागा लढविल्या होत्या. राज्यातील नागपूर, बारामती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगरसह अन्य दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा याच महिन्यात होऊ शकते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 436 जागा लढवल्या होत्या आणि 303 जागा जिंकल्या होत्या. 133 जागांवर भाजप थेट पराभूत झाला होता आणि 27 जागांवर मित्रपक्षाचे उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे या पराभूत झालेल्या 160 जागांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.
या पराभूत झालेल्या 160 जागांची जबाबदारी 45 केंद्रीयमंत्री, शंभरहून अधिक खासदारांवर देण्यात आली होती. या 160 जागांची जबाबदारी घेतलेल्या नेतेमंडळींनी सर्व मतदारसंघ बांधणीसाठी काम केले आहे. यामध्ये बूथवाईज कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारत केंद्र सरकारने केलेले काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. त्याचा फायदा आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत होईल, असा अंदाज बांधला जात आहे.