no images were found
पीएच.डी. प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी संशोधन पद्धतीचे तंत्र महत्वाचे: डॉ. कृष्णा पाटील
कोल्हापूर(प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी विषयाच्या अभ्यासाबरोबर संशोधन पद्धतीचे तंत्र आत्मसात करणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. कृष्णा पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्यावतीने पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी ‘पीएच. डी. प्रवेश परीक्षा तयारी’ याविषयावर ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या समारोपाच्या सत्रात ‘संशोधन पद्धती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के. मोरे होते. यावेळी उपकुलसचिव डॉ.एस.एम.कुबल, श्री.सी.एस.कोतमिरे उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले की, पीएच.डी. प्रवेश परीक्षेची तयारी करताना मागील प्रश्नपत्रिका संच सातत्याने सोडविले पाहिजेत. प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण केल्यास प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असतात, याची माहिती मिळू शकते. विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्रवेश परीक्षा तयारी करताना अभ्यासावेळी स्वत: प्रश्न तयार करणे म्हणजे चांगला उत्तर कर्ता होण्यासारखे आहे. अभ्यास करताना संशोधन पद्धती व तंत्राचा ही अभ्यास करणे आवश्यक आहे.
संशोधन पद्धतीमध्ये संशोधन तंत्र व अर्थ विवेचन यांना महत्व आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सोडविताना संज्ञा व संकल्पना माहित असणे गरजेचे आहे. मुलभूत संशोधन, उपयोजित संशोधन व कृती संशोधन या संशोधन प्रकाराचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास संशोधन पद्धती समजण्यास मदत होईल. तसेच अभ्यासक्रम माहित असणे ,कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात यावर ही विश्लेषण करणे गरजेचे आहे. त्यासाठी महत्वाची पुस्तके व मार्गदर्शन महत्वाचे आहे. त्याच बरोबर अभ्यासातील सातत्य महत्वाचे आहे. असे डॉ.पाटील म्हणाले.
प्रा.डॉ.मोरे म्हणाले की, पीएच.डी. प्रवेश परीक्षेची तयारी करताना संशोधन पद्धतीचा मुलभूत अभ्यास करणे गरजेचे आहे. स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुशांत माने यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ.नितीन रणदिवे यांनी केले तर आभार डॉ.प्रकाश बेळीकट्टी यांनी आभार मानले.