no images were found
जम्मू-काश्मीर व लडाख ही भारताची शान: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
- लोकभवन येथे जम्मू-काश्मीर व लडाख स्थापना दिन साजरा
मुंबई, : जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना प्रत्येक भारतीयाच्या मनात विशेष स्थान आहे. हा प्रदेश भारताचा मुकुट आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ म्हणजे हृदयांची, मनांची आणि दृष्टीची एकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
केंद्र सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत लोकभवन येथे जम्मू-काश्मीर आणि लडाख स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. स्थापना दिन ३१ ऑक्टोबर रोजी आहे. मात्र राष्ट्रपतींच्या नाशिक दौऱ्यामुळे हा कार्यक्रम एक दिवस आधी घेण्यात आल्याचे राज्यपालांनी सांगितले.
कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जीएचआरटी इंटरनॅशनलचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. आर. रहमा, आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यासोबतच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले ‘युवा संगम-७’ चे सदस्य, जम्मू-काश्मीर डोग्रा समाज आणि काश्मिरी पंडित असोसिएशनचे सदस्य, सत्कारमूर्ती, कलावंत, विद्यार्थी आणि मूळ जम्मू-काश्मीरचे निमंत्रित उपस्थित होते.
पृथ्वीवरील स्वर्ग
राज्यपाल म्हणाले, “जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील डोंगर, सुंदर दऱ्या, सरोवरे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आपल्या देशाचे सौंदर्य दाखवतात. पृथ्वीवर स्वर्ग असेल, तर तो इथेच आहे, असे म्हटले जाते. काश्मीरचे लोक प्रेमळ आणि आपुलकीने स्वागत करणारे आहेत. तिथल्या हस्तकला आणि कलावस्तू जगभर प्रसिद्ध आहेत. लडाखला जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. आज लडाख प्रगतीच्या मार्गावर आहे.”
एकसारखेपणा नव्हे, एकता
विविध राज्यांचे स्थापना दिन सर्वत्र साजरे करण्याची संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडली. आपण कुठेही असलो, तरी एकमेकांची संस्कृती जाणून घ्यावी, हा यामागचा उद्देश असल्याचे राज्यपाल म्हणाले. ते म्हणाले, “एक भारत म्हणजे एकसारखेपणा नाही. ही हृदयांची, मनांची आणि देशाला पुढे नेण्याच्या दृष्टीची एकता आहे. एकत्र काम करून यश मिळवण्याची ही एकता आहे. एकसारखेपणा निसर्गात नाही. फुले, झाडे, प्राणी वेगवेगळे आहेत, तरीही सर्वांत एक प्रकारची एकता आहे. ही एकता भारताच्या विविध संस्कृतींतून उत्तम दिसते.” ईशान्य भारताचे उदाहरण देताना राज्यपाल म्हणाले, “ईशान्य भारत हा अतिशय वैविध्यपूर्ण प्रदेश आहे. दर काही किलोमीटरवर वेगळी भाषा आणि वेगळ्या परंपरा दिसतात. काश्मीर आणि लडाखची नृत्ये, भाषा आणि मूल्यव्यवस्था, तसेच इतर राज्यांच्या संस्कृती एकत्र येऊन भारताची ओळख घडवतात. कोणतीही एक संस्कृती आपली सभ्यता ठरवत नाही. सर्व संस्कृती मिळून भारतीय सभ्यता घडवतात. सर्व संस्कृती आणि भाषांचा हा संगम म्हणजेच ‘भारतीयता’. ही भावना देशभरातील सर्व लोकभवनांमध्ये साजरी केली जाते.”
मुळे जितकी खोल, तितका वृक्ष उंच
राज्यपाल म्हणाले, “आपण कुठेही राहिलो, तरी आपल्या मूळ राज्याला विसरत नाही. आपले बालपण तिथे गेलेले असते आणि आपली मुळे तिथे खोलवर असतात. वृक्ष कितीही मोठा झाला, तरी त्याचे पोषण मुळेच करतात. वृक्ष जितका उंच, तितकी त्याची मुळे खोल जातात. समाजही निसर्गाचेच प्रतिबिंब आहे. आपण आपल्या मुळांचे पोषण करतो, तेव्हा आपलेच पोषण होते आणि आयुष्यात पुढे जाताना मनही समृद्ध होते.” काश्मीर, जम्मू आणि लडाखची संस्कृती विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावी, असे राज्यपाल म्हणाले. वेगवेगळ्या राज्यांतील विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ राज्याचा स्थापना दिन आनंदाने साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “जिथे हृदय, तेच घर” असे ते म्हणाले. इतिहास, संस्कृती, नृत्य, गीत, खाद्यसंस्कृती आणि हस्तकलांनी समृद्ध असलेले हे प्रदेश देशाचे गौरवशाली घटक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक
जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील कलावंतांनी, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अभ्युदय नगर, काळाचौकी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या सादरीकरणांतून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरा सुंदरपणे दिसल्या, असे राज्यपाल म्हणाले. सुंदर वेशभूषा, अचूक ताळमेळ आणि उत्तम सादरीकरणाबद्दल त्यांनी कलावंतांचे कौतुक केले.
या कलावंतांना महाराष्ट्रात आणल्याबद्दल राज्यपालांनी जीएचआरटी इंटरनॅशनलचे अभिनंदन केले. संस्मरणीय कार्यक्रमासाठी त्यांनी महानगरपालिकेच्या शाळा आणि प्रशासनाचेही अभिनंदन केले. ‘युवा संगम-७’ मधील युवकांचे आणि त्यांचे यजमान असलेल्या आयआयटी मुंबईचे त्यांनी स्वागत केले. मूळ जम्मू-काश्मीर आणि लडाखचे जे लोक महाराष्ट्रात राहतात, त्यांच्याशिवाय हा उत्सव अपूर्ण राहिला असता, असेही ते म्हणाले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते जम्मू-काश्मीरशी जोडलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात फिजिओथेरपिस्ट डॉ. एजाज अशाई, एफआयसीसीआय एफएलओच्या वरुणा आनंद, जीएचआरटी इंटरनॅशनलचे अध्यक्ष डॉ. एच. आर. रहमान, शास्त्रज्ञ प्रा. डॉ. मामिदाना श्रीधर, कृपानिधी बिस्वाल, अभिनेत्री व लेखिका लेस्ली त्रिपाठी, अर्थविश्लेषक डॉ. दत्तात्रय श्रीपती काटे, निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. नीरज जसवंत शाह, मुख्याध्यापिका संगीता ठाकूर, अभिनेते तेज सप्रू, अभिनेत्री-दिग्दर्शिका प्रीती सप्रू, अभिनेते मुकेश ऋषी, राहुल भट, अश्वथ भट, रंगभूमी दिग्दर्शिका मुस्कान गोस्वामी यांचा समावेश होता.
याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, माजी महापौर श्रद्धा जाधव व बीएमसी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, डोगरा समाज ट्रस्टचे अध्यक्ष कृष्ण पंडित व सल्लागार निधी डोगरा, काश्मिरी पंडित असोसिएशनचे अध्यक्ष अश्विनी भट, विश्वस्त राजेश शाह व सचिव अजय धर, तसेच आयआयटी मुंबईचे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे यांच्यासह युवा संगमचे प्रतिनिधी यांचाही सत्कार करण्यात आला. युवा संगमची यजमान संस्था असलेल्या एनआयटी श्रीनगरच्या पथकाचाही यावेळी सन्मान झाला. यात मुख्य नोडल अधिकारी प्रा. डॉ. अशोक कुमार, प्रा. डॉ. मोहम्मद रफिक तेली, नोडल अधिकारी प्रा. लेफ्टनंट डॉ. नितिका कुंदन आणि प्रा. डॉ. जननी एल. यांचा समावेश होता. या पथकाने काश्मीरची कला दर्शवणारी स्मृतिचिन्हे प्रदान केली.