no images were found
आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणासाठी प्रधान सचिवांचा कोल्हापूर दौरा; आरोग्य संस्थांची सखोल पाहणी व आढावा
कोल्हापूर,: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी आज २१ ऑगस्ट रोजी जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला.
सकाळच्या सत्रात डॉ. निपुण विनायक यांनी आरोग्य उपकेंद्र, कुर, प्राथमिक आरोग्य केंद्र, मडीलगे तसेच ग्रामीण रुग्णालय, गारगोटी येथे भेट देऊन तेथील आरोग्य सेवांचा तसेच सेवा, उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ,औषधसाठा, नोंदवही व रुग्णसेवेची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर, सेवा गुणवत्तेत सुधारणा आणि नागरिकांना वेळेत व सुलभपणे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या. दुपारच्या सत्रात अमृतसिद्धी हॉल,कळंबा येथे जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये शासकीय आरोग्य संस्थांमार्फत नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या १३ प्रमुख आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड. यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यशाळेस जिल्हास्तरीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे अधीक्षक,जिल्हा व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे समन्वयक उपस्थित होते.