Home Uncategorized रंकाळा परिसरातील रस्त्यांवरील अडथळे हटविण्यासाठी धडक कारवाई; 250 हून अधिक हातगाड्या हटविल्या

रंकाळा परिसरातील रस्त्यांवरील अडथळे हटविण्यासाठी धडक कारवाई; 250 हून अधिक हातगाड्या हटविल्या

1 min read
0
0
5

no images were found

रंकाळा परिसरातील रस्त्यांवरील अडथळे हटविण्यासाठी धडक कारवाई; 250 हून अधिक हातगाड्या हटविल्या

कोल्हापूर, : महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 1 गांधी मैदान, विभागीय कार्यालय क्र. 2 छत्रपती शिवाजी मार्केट तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने रंकाळा परिसरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत हातगाड्यांविरोधात आज धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 250 हून अधिक हातगाड्या हटविण्यात आल्या. यावेळी बायोमेट्रिक धारकांच्या 85 हातगाड्या आढळून आल्या.

            महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर संबंधित हातगाडीधारकांनी स्वतःहून गाड्या हटविल्या. मात्र, सूचना देऊनही ज्या हातगाड्या हटविण्यात आल्या नाहीत, त्या महापालिकेच्या पथकाने जप्त केल्या.

            या कारवाईदरम्यान आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी रंकाळा परिसराची स्वतः फिरती करून पाहणी केली. रस्त्यांवरील सर्व अडथळे तातडीने दूर करून रहदारीसाठी रस्ता पूर्णपणे खुला करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवून अनधिकृत हातगाड्या हटविण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पार्किंगचे पट्टे मारण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

            महानगरपालिकेच्या ठराव क्र. 83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजच्या कारवाईत जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

            या कारवाईत उपआयुक्त किरणकुमार धरवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शहर अभियंता रमेश मस्कर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, मिलिंद जाधव, निवास पोवार, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पदमल पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत यांच्यासह अतिक्रमण विभाग, अग्निशमन दल, पोलीस विभाग तसेच विभागीय कार्यालय क्र. 1 व 2 मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

            महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक, रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स तसेच इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपले अतिक्रमण तातडीने स्वतःहून हटवावे. अन्यथा कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य परत केले जाणार नाही, असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पत्रकारितेमुळे अनोळखी जग पाहायला मिळाले : ओलवे

पत्रकारितेमुळे अनोळखी जग पाहायला मिळाले : ओलवे कोल्हापूर, : पत्रकारितेमुळे जे जग कधी पाहिल…