
no images were found
आमदार अपात्रतेच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. यानुसार शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच शिंदे गटाच्या १६ आमदारांना पात्र ठरवत ठाकरे गटाच्या १४ आमदारांनाही पात्र ठरवण्यात आले आहे. या निकालानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.उध्दव ठाकरे गटाने हा निकाल दिल्यानंतर निराशा व्यक्त केली आहे.
यादरम्यान भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं असून त्यांनी शिंदे गटातील नेत्यांचं अभिनंदन देखील केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये “मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.” असे फडणवीस म्हणाले आहेत.
“पण, काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही.” असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.”मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल! मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. ” असे फडणवीस म्हणाले आहेत.