no images were found
उद्धव ठाकरेंना ‘शिवसेने’च्या निकालाचं थोडं दु:ख असणारच- बच्चू कडू
शिवसेनेतील निर्णयाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निवाडा विधानसभाअध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. त्याचवेळी वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत दोन्ही गटांच्या आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे या निकालानंतर ‘शिवसेने’चे सारेच आमदार पात्र ठरले आहेत. या निकालावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे.
“एकनाथ शिंदेंकडे ४० आमदार असल्यानं शिवसेना त्यांचीच असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा निकाल खोटा असेल, तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. पण, न्यायालयाच्या निकालावर आक्षेप घेतल्यास मग कठीण आहे.”
“उद्धव ठाकरेंना निकालाचं थोडं दु:ख असणारच. कारण, ठाकरे घराण्यानं शिवसेना उभी केली आहे. उद्धव ठाकरेंना वेदना सहन कराव्या लागतील. तसेच, ही वेळ का आली? याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. उद्धव ठाकरेंची चूक काढण्याएवढा मी मोठा नाही. पण, प्रत्येकानं आपली चूक शोधली पाहिजे. एवढी मोठी गडबड झाली म्हणजे कुठेतरी चुकलं असेलच,” असं बच्चू कडूंनी म्हटलं. चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात, असं नाही”
“धनुष्यबाण चिन्हापेक्षा कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं लागते. चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात, असं नाही,” असा सल्लाही बच्चू कडूंनी शिंदे गटाला दिला आहे.
“विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अपमान केला” “शिवसेना कुणाची आहे हे लहान मुलगा सांगू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या चौकटीत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेणे अपेक्षित होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे,” असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.