Home सामाजिक मालदीववर भारतीयांचा संताप, सर्व बुकिंग्स रद्द!

मालदीववर भारतीयांचा संताप, सर्व बुकिंग्स रद्द!

0 second read
0
0
36

no images were found

मालदीववर भारतीयांचा संताप, सर्व बुकिंग्स रद्द!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना भेट दिली होती. या भेटीदरम्यान तिथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर मोदी यांनी स्वतःचे काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, हे फोटो पाहून मालदीवमधील काही नेत्यांचा तीळपापड झाला आहे. लक्षद्वीपमधील मोदींचे फोटो पाहून मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अपमानास्पद टीका केली. तर काही नेत्यांनी थेट भारतीयांवर वर्णद्वेषी टीका केली. मालदीवमधील मंत्र्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर भारतीय नागरिक, कलाकार आणि खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. भारतीय नागरिक सोशल मीडियावर मालदीव सरकारचा निषेध नोंदवत आहेत. त्याचबरोबर एक्स या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मवर मालदीववर बहिष्कार घालण्याचं, फिरण्यासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. ‘बॉयकॉट मालदीव’ असा हॅशटॅगदेखील रविवारपासून ट्रेंड होतं आहे.
अशातच अनेक भारतीयांनी त्यांची मालदीववारी रद्द केली आहे. यासह काही ट्रॅव्हल कंपन्यांनीदेखील मालदीवसाठी बुकिंग्स घेणं बंद केलं आहे. तर काही ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवसाठी लोकांनी केलेले बुकिंग्स रद्द केले आहेत. देशातली मोठी ट्रॅव्हल कंपनी ईजमायट्रिपने मालदीवसाठी बूक केलेली विमानाची सर्व तिकिटं रद्द केली आहेत. कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ निशांत पिट्टी यांनी स्वतः समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. निशांत पिट्टी म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या एकात्मतेसाठी ईजमायट्रीपने मालदीवच्या सर्व फ्लाईट बुकिंग्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालदीवमधील सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर टीका केली होती. रमीझ म्हणाले होते, भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करतोय, ही खेदाची बाब आहे. लक्षद्वीपचं पर्यटन तुम्हाला वाढवायचं आहे हे मान्य. परंतु, ही भ्रामक कल्पना आहे. आम्ही (मालदीव) ज्या प्रकारे सेवा पुरवतो, तशी सेवा तुम्ही लक्षद्वीपमध्ये देऊ शकता का? तुम्ही स्वच्छता पाळू शकता का? तिथल्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये एकप्रकारचा वास येतो, त्याचं तुम्ही काय करणार आहात?
त्यापाठोपाठ मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिउन यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंवर कमेट करत त्यांना ‘विदूषक’ आणि ‘इस्रायलची कठपुतली’ संबोधलं होतं. यासह मालदीवमधील काही मंत्र्यांनी भारतीयांवर वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या होत्या.
दरम्यान, भारत सरकारने रविवारी हा मुद्दा मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर उपस्थित केला. मालदीवमधील भारताच्या उच्चायुक्तांनीदेखील तिथल्या मंत्र्यांच्या टिप्पण्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मालदीव सरकारने अधिकृत निवेदन जारी करत म्हटलं आहे की, आमच्या मंत्र्यांनी केलेली व्यक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक आहेत. मालदीव सरकारचा त्याच्याशी संबंध नाही. यावर मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. सोलिह म्हणाले, मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी समाजमाध्यमांवर भारताविरोधात वापरलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो.
मालदीव सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री इब्राहिम खलील यांनी सांगितलं की, वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. मरियम शिउना यांच्यासह मालशा शरीफ आणि महजून माजिद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …