no images were found
नरेंद्र मोदी यांनी नाशिकला येऊ नये -अनिल घनवट
पुणे : कांदा निर्यातबंदी करून केंद्र सरकारने नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. मोदींच्या नाशिक दौऱ्यादरम्यान कांदा उत्पादक शेतकरी निदर्शने करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदींनी कांदा निर्यातबंदी उठविल्याशिवाय नाशिकला येऊ नये, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे.
अनिल घनवट म्हणाले, राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये येणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेला नाशिक जिल्ह्यात मोदींनी जाहीर सभेत कांदा उत्पादकांना चांगले दिवस येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर अनेक वेळा निर्यातबंदी, साठ्यावर मर्यादा, निर्यात शुल्क, किमान निर्यात मूल्य, कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकून कांद्याचे भाव पाडले आहेत. परिणामी कांदा उत्पादक कर्जबाजारी झाला आहे. आता ३१ मार्चपर्यंत निर्यातबंदी लादून नाशिकच्या शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. तरीही मोदी नाशिकला येण्याची हिंमत करतात, म्हणजे कांदा उत्पादक अन्याय सहन करतात, असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे.
कांद्यावरील निर्यातबंदी हटविली नाही तर मोदी यांच्या दौऱ्यात आणि सभेला निषेधाचे फलक घेऊन उभे रहाणे, काळे झेंडे दाखवणे, निर्यातबंदी उठविण्याची मागणी करणारे फलक घेऊन उभे रहाणे, घोषणा देणे, अशा अहिंसक आणि लोकशाही मार्गाने शेतकऱ्यांनी आपली नाराजी जाहीर करावी, असे आवाहन घनवट यांनी केले.