no images were found
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची चर्चा आहे. तर निकाल कोणत्या दिवशी आणि किती वाजता लागणार याबाबतची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार याकडे राज्यासोबतच देशाचं लक्ष लागलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणी निकाल देणार असून तो दिवस आता जवळ आला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूने निकाल आला तर पुन्हा राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. दरम्यान हा निकाल कोणत्या दिवशी किती वाजता लागणार याची माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी दुपारी ४ नंतर लागणार निकाल लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधीमंडळात निकालातील शाब्दिक त्रूटी दूर करण्याचे काम सुरु असून निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याचीही माहिती आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
एकनाथ शिंदे समर्थक आमदार आणि खासदार यांनी शिवसेनेत बंड केलं. अनेक आमदार खासदारांनी शिंदेंना साथ दिली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमच्याकडे आमदार आणि खासदार संख्या जास्त असल्याने शिवसेना पक्ष आमचा असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्यानंतर पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आणि नावावर देखील शिंदे गटानं दावा केला. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला. तेव्हापासून खरी शिवसेना कोणाची याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली . दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे, आमदार अपात्रतेप्रकरणी निकाल येण्याआधी ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रते प्रकरणी काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.