
no images were found
बहुमतपासून भाजपला रोखणे शक्य आहे!
भाजपला सलग तिसऱ्यांदा लोकसभेतला विजय यंदा हवा आहे, त्यापासून भाजपला कोण अडवणार आणि कसे? हा प्रश्न वरवर पाहाता निरुत्तर करणाराच वाटेल. अगदी भाजपच्या विरोधी पक्षांमधले काहीजणसुद्धा, भाजपला अडवणे कठीण असल्याची कबुली खासगीत बोलताना तरी देऊ लागले आहेत! पण मला तसे वाटत नाही. ‘उरलेल्या तीन महिन्यांत काही तरी चमत्कार’ घडेल यावर माझा अजिबात विश्वास नसूनसुद्धा आणि हिंदीपट्ट्यातील तीन राज्यांमध्ये भाजपने अलीकडेच मिळवलेला विजय किती दणदणीत होता, त्या विजयाचे श्रेय मोदींच्या लोकप्रियतेलाच कसे द्यावे लागेल याची पूर्ण कल्पना मला असूनसुद्धा , मला तसे वाटत नाही. अलीकडचा विजय आणि त्याआधीचे सारे विजय हे पुरावे म्हणून मांडायचे आणि त्यातून ‘पुढेही भाजप जिंकणारच’ असा निकाल द्यायचा, यापेक्षा निराळा विचार जर प्रचाराचा मानसिक पगडा बाजूला सारला तर करता येतो, हे मात्र मला माहीत आहे.
निवडणुकांचा शास्त्रीय अंदाज बांधण्याच्या पद्धतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे जनमताचे कौल, सर्वेक्षणे आणि गणन. सध्या कुठलेही सर्वेक्षण ‘इंडिया’आघाडीचा विजय होणार किंवा भाजपचा पराभव होणार असे सांगत नाहीत हे खरे. पण जर विरोधी पक्षांकडे व्यूहरचना असेल आणि कल्पकपणे ती राबवण्याची राजकीय इच्छाशक्तीही असेल, तर भाजपची दौड २७३ हून कमी जागांवर अडवता येऊ शकते. ही व्यूहरचना किंवा ‘रणनीती’ २०२४ च्या लोकसभा निवडणुकांत राबवण्यासाठी मुळात ‘रणा’चेच तीन भाग ओळखावे लागतील. म्हणजे मतदारसंघांचे तीन प्रकार आहेत, असे मानून तीन्ही प्रकारांत निरनिराळे काम करावे लागेल.
ज्या जागांवर भाजपला काही फारसे स्थान नाही, जिथे भाजप उमेदवार तिसऱ्या स्थानावर वा त्याहून खालीच होता, असे हे मतदारसंघ. दक्षिणेकडलया राज्यांत – केरळ, तमिळनाडू व आंध्र प्रदेशात ते आहेतच आणि आता तर तेलंगणातही दिसून आले आहेत. यात पंजाब, जम्मू-काश्मीर, मिझोरम आणि नागालँड इथलेही मतदारसंघ मोजले तर लोकसभेच्या १२० जागा होतात. या १२० पैकी भाजपकडे फक्त सहा जागा आहेत (पंजाबात चार आणि तेलंगणात दोन). गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपला या मतदारसंघांच्या क्षेत्रात प्रगती करता आल्याचेही दिसलेले नाही. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जेवढे साधले होते, तेवढेही तसेच डावपेच आखूनसुद्धा तेलंगणात भाजपला साधता आलेले नाही. लोकसभेसाठी जर पंजाबात अकाली दलाशी आणि तेलंगणात ‘भारत राष्ट्र समिती’शी उघड अथवा छुपा समझोता नसेल, तर भाजपला गेल्या वेळच्या सहा जागा तरी यंदा टिकवता येणार नाहीत अशी परिस्थिती आहे. याउलट, या सर्व राज्यांमध्ये ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांची परिस्थिती चांगली असल्यामुळे, हे पक्ष या राज्यांपुरते अगदी एकेकटे लढले तरी चालेल- मात्र असे करतानाही काही विशिष्ट जागा ओळखून तिथे ‘इंडिया’ची संघटित ताकद दाखवावी लागेल आणि कदाचित नागरी बिगरपक्षीय संघटनांनाही विश्वासात घ्यावे लागेल. या ‘विशिष्ट जागा’ म्हणजे, जिंकलेल्या सहा जागांखेरीज भाजप जिथे यंदा मुसंडी मारू पाहाते अशा जागा… मग ती केरळमधली तिरुवनंतपुरमची जागा असेल, तमिळनाडूतील कोइम्बतूर किंवा कन्याकुमारी मतदारसंघ असतील, तिथे जरी भाजपने जोर लावला तरीही सर्वशक्तीनिशी अडवायचेच, अशी व्यूहरचना ‘इंडिया’आघाडीला करावी लागेल. थोडक्यात या तिय्यम मतदारसंघांमध्ये भाजपच्या महत्त्वाकांक्षेला ‘अवरोध’ महत्त्वाचा ठरेल. या अवरोधाच्या रणनीतीने कदाचित, या राज्यांतभाजपच्या असलेल्या जागाही खेचता येतील.