no images were found
हाफीज सईदला पाक भारताकडं सोपवणार ?
नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याचं भारताकडं प्रत्यार्पण करण्यात यावं, अशी विनंती भारतानं पाकिस्तानकडं केली होती. यासाठीची आवश्यक असलेली कागदपत्रे भारतानं इस्लामाबादला पाठवली होती. हा विनंती अर्ज प्राप्त झाल्याचं पाकिस्ताननं सांगितलं असून भारताच्या या विनंतीला उत्तरही दिलं आहे.
पाकिस्तानी मीडियाच्या माहितीनुसार, भारताच्या विनंतीला उत्तर देताना पाकिस्तानच्या फॉरेन ऑफिसचे प्रवक्ते मुमताज झहरा बलोच यांनी सांगितलं की, हाफीज सईदला भारताकडं सुपूर्द करण्याची विनंती करणारा भारताचा अर्ज पाकिस्तानला प्राप्त झाला आहे. तथाकथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्याचं प्रत्यार्पण करावं अशी विनंती भारतानं यात केली आहे.
पण पाकिस्तानी प्रवक्त्या मुमताज यांनी याला उत्तर देताना म्हटलं की, भारत आणि पाकिस्तान यांमध्ये परस्पर प्रत्यार्पण कायदा अस्तित्वात नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं पाकिस्तानकडून सईद हाफीजला भारताकडं प्रत्यार्पणाच्या स्वरुपात सुपूर्द केलं जाऊ शकत नाही, असंही स्पष्ट केलं आहे.
मुंबई २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हा हाफीज सईद आहे. या हल्ल्यातील अजमल कसाब या एकमेव पकडलेल्या दहशतवाद्याला भारतानं संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन फाशी देखील दिली.या प्रक्रियेत या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं उघड झालं होतं. या संघटनेचा म्होरक्या सईद हाफीज हा आहे. यानंतर कट्टर मौलवी असलेल्या हाफीज सईदला सन २०१९ मध्ये पाकिस्तानच्या काऊंटर टेररिझम डिपार्टमेंटनं अटक केली होती. त्याच्यावर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर विविध प्रकारचे २३ प्रकरणं दाखल आहेत.