no images were found
भाजपा राम मंदिराचे राजकारण करते – शरद पवार
अमरावती : भाजपा राम मंदिराचे राजकारण करीत आहे की व्यवसाय हे त्यांनाच ठाऊक, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. अयोध्येत राम मंदिर उभारले गेले, त्याचा आपल्याला आनंद आहे. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण आपल्याला मिळालेले नाही. साधारणपणे पूजा-अर्चना ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी सहसा जात नाही. प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा असते. त्याला आपला विरोध नाही. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले की नाही, हे आपल्याला माहीत नाही, असे पवार यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल अपेक्षेनुसार लागलेले नाहीत. पण, त्यामुळे आम्ही नाउमेद झालेलो नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी एकत्रपणे लढली, तर देशात सत्तापरिवर्तन शक्य आहे, असा दावा पवार यांनी केला. इंडीया आघाडीने आगामी निवडणुकीसाठी एकत्रितपणे सामोरे जाणे आवश्यक आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना आघाडीत सहभागी करून घेण्याविषयी समाजवादी पक्षाचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्यांना बाजूला सारून वेगळा निर्णय घेण्याची गरज नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्हावा, ही सर्वांचीच इच्छा आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे पवार यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, नुकतीच इंडिया आघाडीची बैठक झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दक्षिणेकडून ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली होती. आता उत्तर भारतातही ही यात्रा व्हावी, अशी सूचना काही सहकाऱ्यांनी केली. त्यानुसार आता राहुल यांनी पुन्हा ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.