no images were found
शिवाजी विद्यापीठात ‘अन्वेषण’ संशोधन महोत्सवास प्रारंभ
कोल्हापूर( प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात आज दोन दिवसीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ ‘अन्वेषण’ विद्यार्थी संशोधन महोत्सव-२०२३ ला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसंचालक तथा संशोधन विभागाचे प्रमुख व ‘अन्वेषण’चे निमंत्रक डॉ. अमरेंद्र पाणी यांच्या हस्ते आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
भारतीय विद्यापीठ महासंघ, शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पदवी स्तरापासून ते पीएचडी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा या महोत्सवामध्ये समावेश आहे. पश्चिम विभागामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व राजस्थान या पाच राज्यांतील ११ विद्यापीठांनी महोत्सवात सहभाग घेतला असून त्यांनी एकूण ६४ संशोधन प्रकल्प सादर केले आहेत. महोत्सवात एकूण १०८ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले असून त्यात विद्यार्थिनींची संख्या ४५ इतकी आहे. संघप्रमुख १९ असून विषयतज्ज्ञ १७ आहेत.
महोत्सवात मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व संलग्न क्षेत्रे, आरोग्य विज्ञान व संलग्न क्षेत्रे, सामाजिक विज्ञान, मानव्यशास्त्रे, वाणिज्य, व्यावसायिक व्यवस्थापन आणि विधी या विविध क्षेत्रांतर्गत संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले. त्यामध्ये बायोसेन्सर्स, ऑटोमेटेड कापणीयंत्रे, जिव्हास्पर्शावर चालणारी खुर्ची, अत्याधुनिक तंत्राधारित कांदाचाळ, आधुनिक एअरो-सेल, औषधे पुरविणारे फार्मा एटीएम, पाईपलाईनमधील बिघाड शोधणारे उपकरण, विजेचे प्रिपेड मीटर, वीज चोरी ओळखणारे थेफ्ट डिटेक्टर, एडव्हान्स्ड थिन फिल्म डिपॉझिशन, औषधी सुगंधी मेणबत्ती, अळंबीच्या साक्यापासून थ्री-डी प्रिंटींग, गवत व तंतूमुळांपासून भांडी निर्मिती, ऑटो कम्पोस्टेबल सॅनिटरी पॅड, ग्रामीण भागातील बालकांसाठी स्लीपिंग बॅग्ज, नाकाद्वारे मेंदूपर्यंत औषधवाही जेल, लिंगभेदविरहित ओष्ठशलाका यांसह शेतकऱ्यांसाठी निवृत्ती वेतन योजना अशा विविध लक्ष्यवेधी संशोधन प्रकल्प व पोस्टर्सचा समावेश आहे. यातील अनेक संशोधने पेटंटपर्यंतही गेलेली आहेत.
उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिर्के, डॉ. पाणी, डॉ. नेगी यांनी सर्व संशोधन मांडणीची पाहणी केली. त्याचप्रमाणे सहभागी संशोधकांकडून त्यांच्या संशोधनाविषयी सविस्तर जाणूनही घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, अन्वेषण समन्वयक डॉ. कविता ओझा, डॉ. विजयकुमार कुंभार, डॉ. कबीर खराडे, डॉ. दत्तात्रय गायकवाड, डॉ. शंकर हंगीरगेकर, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. ऊर्मिला पोळ यांच्यासह विविध अधिविभागांचे शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.