no images were found
‘वागले की दुनिया’ मालिकेने आगामी कथानकात एडीएचडी आणि मानसिक आरोग्याच्या आव्हानांवर टाकला प्रकाशझोत
सोनी सबवरील ‘वागले की दुनिया – नई पिढी नये किस्से’ ही हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिका मध्यमवर्गी वागले कुटुंबाला भेडसावणाऱ्या आव्हानांची मनोवेधक झलक सादर करते. त्यांच्या रोजच्या संघर्षांदरम्यान ही मालिका बहुतेक वेळा सामाजिक समस्यांना उजागर करते तसेच आपल्या समाजातील ज्वलंत मुद्द्यांना हात घालून संवाद करायला भाग पाडते. मालिकेतील अलीकडच्या भागांत आपण पाहिले की, किट्टू (माही सोनी) हिला अटेन्शन-डेफिसिट/हायपरअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी) या विकाराचे निदान होते. या अपरिचित स्थितीला कसे हाताळायचे हेच माहीत नसल्यामुळे वागले कुटुंबीयांना काहीच कळेनासे होते.
मालिकेचे आगामी भाग मानसिक आरोग्याच्या नाजूक थीमवर बेतलेले असणार आहेत. अशा समस्यांबाबत काही नेहमीच्या गैरसमजूती आणि निर्णयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सुरुवातीला किट्टूच्या संघर्षाला केवळ एक विक्षेप आणि अतिचंचलता म्हणून ठरवले जाते. मात्र जेव्हा सखी (चिन्मयी साळवी) यात हस्तक्षेप करते तेव्हा वागले कुटुंब हळूहळू किट्टूला समजू लागते. ती एखाद्या समुपदेशकाशी चर्चा करण्याचा सल्ला देते. मात्र सुरुवातीला वागले कुटुंब त्याला विरोध करते. मात्र या प्रश्नात व्यावसायिक मदतीची किती गरज आहे, याचे महत्त्व त्यांना कळून चुकते. एडीएचडी या विकाराचे अचूक निदान आणि त्यावर उपचारांची गरज उमगणे आणि या विकाराला समजून घेत त्याचा स्वीकार करण्याच्या महत्त्वावर ही कथा भर देते.
मालिकेत राजेश वागलेची मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत राघवन म्हणाला की, “वेगवेगळ्या पिढ्यांच्या नजरांतून सामाजिक मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे वागले की दुनिया मालिकेचा एक भाग बनणे ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे. किट्टूला ADHD विकाराचे निदान होणे हे एक महत्त्वपूर्ण कथानक आहे. यातून मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असलेल्या व्यक्तींचा संघर्ष आणि समाजातील त्यांच्याबाबतच्या गैरसमजूतींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मालिकेचे कथासूत्र जसजसे उलगडते तसतसे ही मालिका अशा मुद्दयांवर हळूहळू वाढणारी समज आणि त्यावरील उपायांकडे लक्ष वेधते. लाेकांना प्रासंगिक मदत घेण्यास प्रोत्साहन देते.” मालिकेत सखी वागलेची भूमिका निभावणारी अभिनेत्री चिन्मयी साळवी म्हणाली की, “मी नव्या पिढीतील असल्यामुळे मानसिक आरोग्यावर खुल्या संवादाची किती गरज आहे, याची मला जाण आहे. आमच्या मालिकेतील आगामी कथानक अशा वैद्यकीय स्थितींबाबत जाण किती महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाला प्रेम तथा सुश्रुषेची गरज असते, याचे स्मरण करून देणारे आहे.”