no images were found
राहुल आवाडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय इचलकरंजी/प्रतिनिधी -इचलकरंजी विधानसभेच्या या रणांगणात भाजपाचे उमेदवार राहुल आवाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यंचा 56 हजार 811 मतांनी पराभूत केले. तर भावनिक आवाहन निवडणूकीत उतरलेले अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांना अवघ्या 2461 मतांवरच समाधान मानावे लागल्याने त्यांच्या 11 उमेदवारांनी अनामत रक्कम जप्त झाली. राहुल आवाडे यांना 1 लाख 31 हजार 919 तर मदन कारंडे यांना 75 हजार 108 इतकी मते मिळाली. राहुल आवाडे यांनी जिल्ह्यातील विक्रमी उच्चांकी मताधिक्य घेत एक नवा विक्रम निर्माण केला आहे.
कोरोची केंद्रापासून सुरु झालेल्या मतमोजणीपासून राहुल आवाडे यांनी मताधिक्य घेत ते कायम ठेवल्याने 5 हजाराचे मताधिक्य घेतल्याचे जाहीर होताच आवाडे समर्थकांनी एकच जल्लोष साजरा केला. शहरातून
मोटरसारकल रॅली काढून आनंदोत्सव साजरा करताना गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली. आवाडे यांनी अभुतपूर्व विजय मिळवल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने 21 फुटी पुष्पहार घालून स्वागत करुन अभिनंदन केले. प्रकाश आवाडे यांचे जनसंपर्क कार्यालय व ‘इंदू-कला’ निवासस्थान परिसर कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. इचलकरंजीसह ग्रामीण भागातही आवाडे यांच्या कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत आनंद व्यक्त केला. ग्रामीण भागातही आवाडे यांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. अनेक ठिकाणी स्पीकर लावून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. महिला कार्यकर्त्याही आनंदोत्सवात मागे राहिल्या नाहीत. आवाडे यांचे निवासस्थान व कार्यालय याठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली होती. आवाडे कुटुंबियही गुलालात रंगून गेले होते. राहुल आवाडे यांच्यासह विजयाचे शिल्पकार असणारे आमदार प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, समन्वयक अशोक स्वामी, भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे, तानाजी पोवार, अरविंद शर्मा, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, भाऊसो आवळे, रवि रजपुते आदींसह अनेक प्रमुख पदाधिकार्यांना कार्यकर्त्यांनी गुलालात न्हावून काढले.
शनिवारी सकाळी 8 वाजता येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवनात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ. मौसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. एकूण 20 टेबलावर ही मतमोजणी सुरु करण्यात आली. तर पोस्टल मतांसाठी दोन टेबल मांडण्यात आले होते. एकूण 14 फेर्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये अगदी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत राहुल आवाडे यांनी आपले मताधिक्य कायम ठेवले होते. मोजक्या केंद्रावर कारंडे अल्पशा मतांनी पुढे राहिले.
उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी, अमर शिंदे (420), मदन कारंडे (75,108), रवी गोंदकर (2143), राहुल आवाडे (1,31,919), डॉ. प्रशांत गंगावणे (477), सचिन बेलेकर (310), शमशुद्दीन मोमीन (1293), अभिषेक पाटील (181), मदन येताळा कारंडे (237), विठ्ठल चोपडे (2461), रावसो निर्मळे (405), शाहूगोेंडा पाटील (323), सॅम आठवले (2133) आणि नोटा (1487).