
no images were found
मनपा रोजंदारी कर्मचारी, ठोक मानधनावरील तांत्रिक अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या अनुषंगाने नियमोचीत कार्यवाही करा : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर ( प्रतिनीधी ) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पवडी, आरोग्य, ड्रेनेज, उद्यान व अन्य विभागाकडे गेली ३० ते ३५ वर्षे रोजंदारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ५०९ च्या आसपास आहे. यासह ठोक मानधन तत्वावरील कार्यरत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), सर्व्हेअर, इलेक्ट्रिक सुपरवायझर व वीज निरीक्षक या तांत्रिक पदांना सोलापूर परभणी महानगरपालिकेच्या धर्तीवर कायम सेवेत घेण्याबाबत नियमोचीत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश आज महाराष्ट्र राज्य शासन नगरविकास विभागाचे कार्यासन अधिकारी श्री.अ.ज्ञा.लांडगे यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यात पुढे म्हंटले आहे की, कोल्हापूर महापालिकेतील ठोक मानधन तत्वावर कार्यरत तांत्रिक अधिकारी व रोजंदारी कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी संबधित कर्मचाऱ्यानी आपल्याकडे केली होती. यासह रोजंदारी कर्मचाऱ्याना किमान वेतन मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू झाले. रोजंदारी कर्मचारी यांच्यासह ठोक मानधन तत्वावरील कार्यरत तांत्रिक अधिकारी यांना सेवेत कायम करण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. यास पहिल्या टप्प्यात यश आले असून, सदर कर्मचाऱ्यांना मा.मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे सादर केलेल्या मागणी पत्राच्या नुशांगाने निमयोचीत कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.