no images were found
चांद्रयान – ३ च्या लँडिंगच्या चार महिन्यांनंतर ISRO ला मोठे यश
भारताच्या चांद्रयान – ३ ने चार महिन्यांपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग करुन इतिहास रचला होता. यामुळे भारताचे जगात कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. दरम्यान आता चार महिन्यांनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.
चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ISRO च्या चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेसाठी आइसलँडमधील हुसाविक येथे असलेल्या ‘एक्सप्लोरेशन म्युझियम’ द्वारे ‘2023 लीफ एरिक्सन लूनर प्राइज’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. रेकजाविकमधील (Reykjavik) भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याची माहिती दिली.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यानाचे पहिले ‘सॉफ्ट-लँडिंग’ आणि “चंद्राच्या शोधात प्रगती करण्यासाठी आणि खगोलीय रहस्ये समजून घेण्यात इस्रोच्या प्रयत्नाचा पुरस्काराने सन्मान केला, असे रेकजाविकमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी आभार मानले. त्यांनी एक व्हिडिओ संदेश पाठवला आणि भारताच्या अंतराळ संस्थेच्या वतीने राजदूत बी श्याम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘लीफ एरिक्सन पुरस्कार’ हा २०१५ पासून एक्सप्लोरेशन म्युझियमद्वारे दिला जाणारा वार्षिक सन्मान आहे.