no images were found
२८ डिसेंबरच्या सभेला सोनिया गांधींसह राहुल गांधी, प्रियंका गांधी लावणार हजेरी
नागपूर : काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जाहीर सभेचे स्थान निश्चित झाले आहे. उमरेड मार्गावरील बहादुरा येथील २४ एकर जागेवर ही सभा होणार आहे. काँग्रेसच्या नागपुरात होत असलेल्या जाहीर सभेला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, काँग्रेस पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य, विधिमंडळ पक्षनेते, विरोधी पक्षनेते, देशभरातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पक्षातर्फे जोरात तयारी सुरू आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य बी.एन. संदीप, अभिषेक दत्त आणि वामशी रेड्डी यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. बी.एन. संदीप, अभिषेक दत्त हे दोन दिवसांपासून नागपुरात आहेत. त्यांनी आज सभास्थळ निश्चित केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा दाभा येथील मोकळा भूखंड आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे वानाडोंगरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पटांगण याचा देखील सभेसाठी विचार सुरू होता. परंतु, त्यावर एकमत होऊ शकले नाही आणि आज बहादुरा येथील एका बांधकाम कंपनीच्या जागेवर कार्यक्रम घेण्याचे ठरले.
दरम्यान, शहर काँग्रेसने आपल्या पातळीवर सभेची तयारी सुरू केली आहे. ख्रिश्चन सेल, असंघटित कामगार सेल, विज्ञान-तंत्रज्ञान सेल आणि ज्येष्ठ नागरिक सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना सभेबाबत आपापल्या पातळीवर जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आघाडीने किमान अडीचशे नागरिकांपर्यंत पोहचण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.