no images were found
वरणगे येथे विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय सहसचिवअनीता शाह-अकेला यांची भेट
कोल्हापूर : लक्षित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी संपर्क अधिकारी असलेल्या केंद्रीय सहसचिव अनीता शाह-अकेला यांनी वरणगे येथे सुरु असलेल्या संकल्प यात्रेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते प्रसिध्दी रथाची फित कापून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वरणगे येथील आयोजित कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना सहसचिव अकेला यांचे हस्ते विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सरपंच युवराज शिंदे, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट, तहसिलदार स्वप्निल रावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा उद्देश उपस्थितांना सांगून सक्षम आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रत्येकापर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत असे प्रतिपादन केले. तहसीलदार तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी विविध योजनांबद्दल उपस्थित ग्रामस्थांना माहिती दिली. सरपंच शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे स्वागत व आभार मानले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या या कार्यक्रमांमध्ये सर्व उपस्थितांना मान्यवरांच्यासह आत्मनिर्भरतेची शपथ दिली. सहसचिव अकेला यांनी त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सर्व स्टॉलवर भेट देऊन योजना देण्याच्या प्रक्रियेबाबत पाहणी केली. कार्यक्रमा अगोदर सहसचिव अकेला यांनी वरणगे येथील चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.