no images were found
नितीन गडकरींच्या पक्षबदल करणाऱ्यांना कानपिचक्या!
महाराष्ट्रात सध्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमधील फुटीची जोरदार चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चालू असून १० जानेवारीपर्यंत शिवसेना फुटीवर त्यांचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीबाबतचाही निकाल येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आमदार-खासदार असे लोकप्रतिनिधी सर्रासपणे पक्षबदल करण्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जात आहे. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी परखड भाष्य केलं आहे.
दरम्यान, राजकीय पक्ष व विचारांचा संबंध नसतो, अशी मिश्किल टिप्पणीही गडकरींनी यावेळी केली. “राजकीय पक्षाचा आणि विचारांचा काय संबंध? राजकीय पक्षांचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. बाकी त्या दृष्टीने ते विचार करतात. देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही सगळ्याच क्षेत्रातली समस्या आहे”, असं गडकरी म्हणाले. “जोपर्यंत जनता जात-पंथ-धर्म-भाषा आणि लिंगाच्या आधारावर मतदान करेल, तोपर्यंत नेतेही तसेच येतील. जेव्हा जनता जागृत होईल, या सगळ्या गोष्टींना महत्व देईल आणि निवडणुकीत विचार करून मतदान करेल तर आपोआप परिवर्तन होईल”, असंही गडकरींनी नमूद केलं.
यावेळी गडकरींनी बोलताना कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते ए. बी. बर्धन यांचं उदाहरण दिलं. “कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख ए. बी. बर्धन यांचं माझ्यावर फार प्रेम होतं. ते खूप विद्वान होते. आयुष्यभर ते कम्युनिस्ट पक्षात होते. पण त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. एखाद्या माणसाचे विचार कदाचित तुम्हाला पटत नसतील. पण त्या विचारांशी प्रामाणिक राहून आयुष्यभर त्याची किंमत चुकवून त्यासाठी जगणारे लोक आजही आपल्या समाजासाठी आदर्श आहेत”, असं गडकरी म्हणाले.