no images were found
५१ वे शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शन आजपासून सुरू
कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा परिषद कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने ५१ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन आज पासून सुरू झाले. या प्रदर्शनात प्राथमिक गटात ७२, माध्यमिक गटात १०२, उच्च प्राथमिक गटात १७ उपकरणे, प्रयोगशाळा परिचर सहाय्यक गटात ९ तर दिव्यांग गटात १ उपकरण मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते आज करण्यात आले. हे प्रदर्शन मंगळवार पेठ पेटाळा येथे न्यू हायस्कूल मराठी शाखेमध्ये भरविण्यात आले आहे.
या प्रदर्शनात मुलांनी बनवलेल्या उपकरणाबद्दल प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवरील उपकरणे, पाणी इंधन वापरून चालणारी गाडी, मिनी एअर कुलर, सुरक्षित प्रवास, पाण्यातील कचरा काढणारे यंत्र , सलाईन अलर्ट, फुग्याची गाडी, गांडूळ खत प्रकल्प, पूर दर्शक अलार्म चॉक स्टिक, इलेक्ट्रिक ड्रायर मॉब, कुंडीतील रोपांचे पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, केशाकर्षण द्वारा रोपांना पाणी, हॉटेल रोबो, होम मेड प्रोजेक्टर, फरशी पुसण्याचे यंत्र, रेल्वे प्लॅटफॉर्म क्रॉसिंग गेट, सॉईल वॉशर सेंसर ,रेन डिटेक्टर, स्मार्ट वॉशरूम यासारखे अनेक उपकरणे विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात मांडले आहेत. हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी बुधवार, दि. १३ डिसेंबर 2023 अखेर सकाळी ११ ते ५ या वेळेपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक केले तर डॉ.स्वाती खाडे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच शैक्षणिक पर्यवेक्षक तथा विज्ञान प्रदर्शन विभाग प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रदर्शनासाठी विजय माळी, उषा सरदेसाई, विलास पवार, डी एस तळप, रसूल पाटील, शांताराम सुतार, राजेंद्र कोरे, प्रकाश सुतार, संतोष आयरे, अनिल सरक, राजेंद्र पाटील, शिवाजी भोसले, न्यू हायस्कूलचे एनसीसी विद्यार्थी हे विशेष परिश्रम घेत आहेत.
यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, सहाय्यक आयुक्त डॉ.विजय पाटील, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकर हेरवाडे, प्रशासन अधिकारी शंकर यादव, माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी धनाजी पाटील, न्यू हायस्कूल मराठी शाखेचे मुख्याध्यापक शशिकांत तांदळे उपस्थित होते.