no images were found
महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार?
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भातील सल्ला दिला आहे. मंगळवारी राजभवनामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना रमेश बैस यांनी बदलत्या जीवनशैलीचा संदर्भ देत शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भात भाष्य केलं. “बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्या झोपेच्या वेळा बदलल्यात. मध्यरात्रीपर्यंत मुलं जागीच असतात. मात्र शाळांसाठी मुलांना लवकर उठावं लागतं. त्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही. मुलांना चांगली झोप मिळावी या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळेच शाळांच्या वेळा बदलण्याबद्दल विचार करायला हवा,” असं बैस यांनी म्हटलं आहे.
मंगळवारी राजभवनामध्ये राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री एकनात शिंदेंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिलेल्या भाषणात राज्यपालांनी शालेय विद्यार्थ्यांवर ताण दूर करण्याच्या दृष्टीने आपली मतं मांडली. राज्यपाल बैस यांनी शिक्षण विभागाला शाळांच्या वेळेसंदर्भात सूचना केल्या आहे. “ई-वर्गांना चालना देणं गरजेचं आहे. यामध्यमातून मुलांच्या दप्तराचा भार हलका करण्यासाठी पुस्तकविहीन शाळेचा विचार करता येईल. गुणवत्तेनुसार शाळांना श्रेणी द्याव्यात आणि यापैकी सर्वोत्तम शाळांना बक्षिसे द्यावीत. या माध्यमातून शाळांमध्ये सुधारणेसाठी स्पर्धा निर्माण होईल,’ असं बैस यांनी नमूद केलं.
विद्यार्थ्यांना शिक्षकांनी कमी गृहपाठ द्यावा असंही राज्यपाल बैस यांनी सुचवलं. “शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांना कमी गृहपाठ कमी देण्याकडे शिक्षकांचा कल हवा. त्याचप्रमाणे खेळ व इतर कृतिशील उपक्रमांवरही शिक्षकांनी भर द्यायला हवा,’ अशा सूचनाही बैस यांनी केल्या. आधुनिक आव्हानांसंदर्भात भाष्य करताना बैस यांनी, ‘सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी शाळांमध्ये व्याख्याने व सत्रांचे आयोजन केले जावे,’ असं म्हटलं आहे.
“राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये असूनही त्यापैकी अनेक ग्रंथालये आज ओस पडल्याचं दिसत आहे. बहुतांश ग्रथांलयांमधील पुस्तके जुनी अथवा कालबाह्य झाली आहेत. राज्यातील सर्वच वाचनालयांना इंटरनेट, कंम्प्युटरसारख्या सुविधा देऊन नवसंजीवनी देण्याची गरज आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून ग्रंथालय दत्तक योजना सुरू करायला हवी,” असेही राज्यपालांनी नमूद केले.
राजभवनामधील याच कार्यक्रमामध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसंदर्भातील ‘स्वच्छता मॉनिटर-2’, ‘दत्तक शाळा उपक्रम’, ‘गोष्टींचा शनिवार’, ‘माझी शाळा, माझी परसबाग’, ‘आनंददायी वाचन’ या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या नवीन शालेय इमारतींचे लोकार्पण करण्यात आलं. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुरज मांढरे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.