no images were found
काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी पुन्हा एकदा ईडीची धाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांच्या घरी आज ईडीने पुन्हा एकदा धाड टाकली. आज सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी पोचलेत. सकाळी ४ ते ५ अधिकाऱ्यांचे पथक मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी दाखल झाले.सलग दुसऱ्यांदा हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ईडीचे पथक हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर जमून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी सकाळी ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. या पथकाकडून मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी छापेमारी करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. यामधील कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने छापेमारी सुद्धा केली होती. आता पुन्हा एकदा ईडीने याप्रकरणावरून मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ईडीचे अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी दाखल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या घराकडे धाव घेतली. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी ईडी आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कागल पोलीस आणि मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी ईडीविरोधात संताप व्यक्त करत आता गोळी घालूनच जावा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.