no images were found
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो पुन्हा आक्रमक!
सहा महिन्यांपूर्वी कॅनडाच्या व्हँकोव्हरमध्ये हरदीप सिंग निज्जर या खलिस्तान समर्थकाची हत्या झाल्यानंतर त्यावरून भारत व कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या प्रकरणात भारताचा हात असल्याचा दावा केला होता. हे आरोप भारतानं फेटाळले असून त्यावरून दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेकडूनही भारतीय अधिकाऱ्यांनी खलिस्तानी दहशतदवाद्याचा अमेरिकेत खात्मा करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर पुन्हा एकदा जस्टिन ट्रुडो आक्रमक झाले आहेत.
कॅनडाच्या व्हँकोव्हर शहरात काही महिन्यांपूर्वी हरदीप सिंग निज्जर याची एका इमारतीच्या पार्किंगमध्ये दोन अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेच्या दोन महिन्यांनंतर जस्टिन ट्रुडोंनी कॅनडाच्या संसदेत भारतीय अधिकाऱ्यांचा या हत्येमागे हात असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांची परत पाठवणी केली. या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय पातळीवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी राष्ट्रांनी भारतविरोधी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, कॅनडापाठोपाठ आता अमेरिकेनंही भारतावर गंभीर आरोप केले आहेत. न्यूयॉर्कमधील खलिस्तान समर्थक व्यक्तीच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्यानं रचल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. यामध्ये ५२ वर्षीय भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचाही दावा अमेरिकेनं केला आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून आरोप फेटाळण्यात आले आहेत. मात्र, यावरून आता ट्रुडो यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात केली आहे.
जस्टिन ट्रुडो यांनी अमरिकेच्या आरोपांनंतर पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. “अमेरिकेकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे आम्ही सुरुवातीपासून जी मागणी करत आलो, तीच अधोरेखित झाली आहे. हे सगळं प्रकरण भारत सरकारनं गांभीर्यानं घ्यायची आवश्यकता आहे”, असं जस्टिन ट्रुडो म्हणाले आहेत.