no images were found
घरफाळा 2 टक्के सवलत योजनेचे शेवटचे आठ दिवस
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या करआकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2023-24 या आर्थिक वर्षामधील घरफाळा देयकाच्या चालु मागणीवर 1 एप्रिल 2023 ते 30 जुन 2023 अखेर 6 टक्के, 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 अखेर 4 टक्के व दि. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 अखेर 2 टक्के सवलत योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये दि. 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 अखेर 2 टक्के सवलत योजनेची शेवटचे 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत.
महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून शहरातील मिळकत कर चालू मागणी एक रक्कमी भरणा करणाऱ्या 8,2026 मिळकतधारकांनी दि.1 एप्रिल ते 22 नोव्हेबर 2023 अखेर रुपये 41 कोटी 52 लाख 30 हजार 466 इतका मालमत्ता कर भरणा केला आहे. यामधील सुमारे 24,451 करदात्यांनी गुगल पे, फोन पे व इतर युपीआय वॉलेट सुविधेचा लाभ घेतलेला आहे.
चालु वर्षातील संपुर्ण घरफाळा भरुन या 2 टक्के सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी मिळकतधारकांनी आपल्याकडील जुनी कराचे बिल, भरणा पावती किंवा मिळकत करदाता क्रमांक सांगून कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात अथवा महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने आपला घरफाळा दि.30 नोव्हेबर 2023 अखेर भरावा असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. अन्यथा दि. 1 डिसेंबर 2023 पासून चालू मागणीवर दरमहा 2 टक्के दराने दंडाची आकारणी सुरु होणार आहे. यांची संबंधीत करदात्यांनी नोंद घ्यावी. तरी शहरातील सर्व मिळकतधारकांनी आपल्या कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे. जास्तीत जास्त करदात्यांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा व दंडासारखा कटु प्रसंग टाळावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.