
no images were found
कोल्हापूर जिल्ह्यात २ डिसेंबर रोजी युवा महोत्सवाचे आयोजन
कोल्हापूर : युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी क्रीडा विभागाकडून युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीचा कोल्हापूर जिल्ह्यातील युवा महोत्सव राजाराम महाविद्यालयातील सभागृहात २ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. याबाबतची बैठक नियोजन समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जास्तीत जास्त युवकांनी स्पर्धांमधे सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी आवाहन केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने प्रतिवर्षी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते व राज्यस्तर युवा महोत्सवातून निवडक १०० युवक युवतींचा चमू केंद्रीय युवा व खेल मंत्रालयाच्या वतीने आयोजित होणा-या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतो.
सन २०२३-२४ या वर्षीचा युवा महोत्सव क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषि आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये समूह व वैयक्तिक लोकनृत्य, समूह व वैयक्तिक लोकगीत, कथाकथन, वक्तृत्व (हिंदी/इंग्रजी), पोस्टर स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रॉडक्ट व पाककृती तसेच संकल्पना आधारित स्पर्धा अशा विविध प्रकारात स्पर्धा होणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष जाहीर केले असल्याने “पौष्टिक तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर” व “सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान” या संकल्पनेवर आधारित स्पर्धा होणार आहेत.
त्याअनुषंगाने जिल्हस्तर युवा महोत्सव आयोजन करणेकरिता जिल्हास्तर आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार, यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, एनएसएस विभागप्रमुख डॉ. टी. एम. चौगले, नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, तालुका क्रीडा अधिकारी अभय देशपांडे, क्रीडा अधिकारी मनिषा पाटील, हे उपस्थित होते.
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे दि. २ डिसेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आला असून कोल्हापूर जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवती सदर स्पर्धेत सहभाग़ी होऊ शकतात. त्याकरिता नाव नोंदणी दि. २८ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/fCfRTezHXbjWNQCs5 या लिंकद्वारे नोंदणी करावी अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधण्यात यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.