no images were found
राजस्थान मिड डे मिल घोटाळा; औरंगाबादेत आयकर विभागाचे छापासत्र
औरंगाबाद : राजस्थानमधील मिड डे मिल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये छापेमारी सुरु आहे. मुंबई, दिल्ली, जयपूर, बंगळुरूसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु केली आहे. औरंगाबाद शहरातही पहाटेपासूनच चार ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी सुरु केली आहे. राजस्थानातील शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजनाच्या अन्नधान्य पुरवठादारावर हे छापे असल्याची माहिती समोर आली आहे. सतीश व्यास असं या अन्नधान्य पुरवठादाराचं नाव आहे.
औरंगाबादेत केंद्रीय तपास यंत्रणांनी पहाटेपासून चार ठिकाणी धाड टाकली आहे. राजस्थानातील मिड डे मिल घोटाळ्याचे इथे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. शहरातील अन्नधान्य पुरवठादार सतीश व्यास यांच्याशी संबंधित ही कारवाई सुरु आहे. सतीश व्यास यांचे घर कार्यालय आणि हॉटेलवर आज छापे पडले. त्याशी संबंधित चार ठिकाणी अधिकाऱ्यांकडून झाडा झडती घेतली जात आहे.
हे व्यापारी शिवसेनेशी संबंधित असल्याचं बोललं जातंय.एका ठिकाणी किमान 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. अशा प्रकारे चारही ठिकाणे मिळून 56 अधिकाऱ्यांचा छाप्यांमध्ये समावेश आहे. सतीश व्यास यांच्याकडे राजस्थानातील अन्नधान्य पुरवठ्याचा ठेका असल्याचा सूत्रांचा अंदाज आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती महत्वाची कागदपत्रे पडल्याची माहिती समोर आली आहे.