
no images were found
थुलिअम फायबर लेसर (टीएफएल) तंत्रज्ञानामुळे वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींच्या उपचारांमध्ये लक्षणीय परिवर्तन…
थुलिअम फायबर लेसर (टीएफएल) तंत्रज्ञान हे वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींसाठी प्रभावी ठरत आहे. वरिष्ठ युरॉलॉजिस्ट आणि एस हॉस्पिटलचे संचालक प्रा.डॉ.सुरेश पाटणकर म्हणाले की अत्याधुनिक उपकरणांसह कमीतकमी जखम करणारी प्रक्रिया, तसेच वाढलेल्या प्रोस्टेटच्या जवळ नसांना होणारे कमी नुकसान, कमीतकमी रक्तस्त्राव व वेदना आणि लवकरात लवकर बरे होणे ही बीनाईन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (बीपीएच) च्या उपचारात परिवर्तनीय ठरत आहे.
प्रोस्टेट ही मूत्रमार्गाच्या सभोवतालची एक ग्रंथी असून या नलिकेद्वारे मूत्र शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. प्रोस्टेट तर्फे तयार करण्यात येणाऱ्या स्रावाने शुक्राणूचे पोषण होते आणि स्खलनानंतर पुरुषांचे वीर्य प्रवाही होते. प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढणे किंवा बीनाईन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (बीपीएच) ही 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येणाऱ्या आरोग्य समस्यांपैकी एक आहे. बीपीएच मुळे मूत्रमार्ग,मूत्रपिंड यांच्या समस्या किंवा लघवीच्या प्रवाहात अडथळे येणे यासारख्या असंख्य समस्या उद्भवू शकतात ज्यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीरपरिणाम होऊ शकतात.
वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे एस हॉस्पिटल हे पुण्यातील पहिले हॉस्पिटल आहे. यावर्षी मार्चमध्ये हे अत्याधुनिक तंत्रज्ञान स्थापित केल्यापासून आतापर्यंत सुमारे 150 हून अधिक रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत.जेव्हा एखाद्या रुग्णाला प्रोस्टेट ग्रंथीं वाढल्याचे निदान होते, तेव्हा आवश्यक असल्यास पीएसए किंवा बायोप्सीद्वारे ही वाढ साधी आहे की कर्करोगजन्य आहे हे निश्चित केले जाते.
याआधी वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींमुळे होणाऱ्या मूत्रमार्गाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी ‘ट्रान्सुरेथ्रल रिसेक्शन ऑफ द प्रोस्टेट’ (टीयूआरपी/टर्प) शस्त्रक्रियेचा उपयोग केला जात होता. मूत्राशय (मूत्रमार्ग) मधून मूत्र वाहून नेणाऱ्या नळीमध्ये लिंगाच्या टोकातून ‘रिसेक्टोस्कोप’ नावाचे उपकरण घातले जाते. गेल्या दशकापर्यंत होल्मियम लेजर टीयूआरपी किंवा टर्प प्रक्रियेचा वापर केला जात असे.
डॉ.सुरेश पाटणकर पुढे म्हणाले की,अलिकडच्या काही काळात प्रोस्टेट शस्त्रक्रियेसाठी थुलिअम फायबर लेसर (टीएफएल) हे होल्मियम लेसरला पर्याय म्हणून उदयास आले आहे. टीएफएल तंत्रज्ञानामुळे वाढलेली बीनाईन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया (बीपीएच) ग्रंथी काढून टाकली जाते आणि मॉर्सेलेटर या उपरणाच्या साहाय्याने छोटे तुकडे करून बाहेर काढले जातात. आधीच्या तंत्रज्ञानामध्ये ऊर्जेचा वापर करून या वाढलेल्या ग्रंथी छोट्या तुकड्यांमध्ये कापल्या जायच्या, त्यामध्ये खोल जखम होत असे यामुळे आजूबाजूच्या नसांना नुकसान होण्याची आणि लैंगिक समस्या उदभवण्याची जोखीम होती. टीएफएल तंत्रामुळे जखम अगदी कमी होत असल्यामुळे त्या भागातील नसांना कमीत कमी नुकसान पोहचते. ज्यामुळे ५० वर्षाच्या आसपास असणाऱ्या लैंगिक दृष्ट्या सक्रिय पुरुषांना ही पद्धत फायदेशीर ठरते. कटिंग आणि कोग्युलेटिंग (होमिओस्टॅटिक) वैशिष्ट्यांमुळे शस्त्रक्रिया अगदी वेदनारहित असल्यामुळे कमीत कमी रक्तस्त्राव होतो आणि रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकतो. वय जास्त असलेल्या किंवा सह्व्याधी असणाऱ्या किंवा रक्त पातळ होण्यासाठी औषधे घेत असलेल्या उच्च जोखीम असलेल्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान फार फायदेशीर आहे. कारण अशा रूग्णांमध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो जो टीएफएल तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात कमी केला जातो.तसेच शस्त्रक्रियेनंतर रक्तस्त्राव होण्याचा धोका, मूत्रमार्ग (स्ट्रिचर्स) अरुंद होण्याचा जोखील कमी असते.एक मोठा किंवा संपूर्ण वाढलेला भाग किंवा उती काढून टाकल्याने, बीपीएच ची समस्या पुन्हा उदभवण्याची शक्यता कमी होऊ शकते.