
no images were found
कृत्रिम प्रज्ञा आव्हान नसून संधी: डॉ. आर. व्ही. कुलकर्णी
कोल्हापूर, ( प्रतिनीधी ) : कृत्रिम प्रज्ञा आता सर्वव्यापी होत आहे. व्यवस्थापन शास्त्रसुद्धा त्याला अपवाद नाही. याकडे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या शिक्षकांनी आव्हान म्हणून न बघता संधी म्हणून पाहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे क्षेत्रीय संचालक प्रा. (डॉ.) आर. व्ही. कुलकर्णी यांनी केले. शिवाजी विद्यापीठामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षक परिषदेच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग प्रमुख डॉ. आण्णासाहेब गुरव होते.
. डॉ . कुलकर्णी यांनी कृत्रिम प्रज्ञा या विषयातील विविध बारकावे, त्यामुळे दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, विविध कामाच्या स्वरूपामध्ये होऊ घातलेले बदल यांवर विस्तृत विवेचन केले. वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील शिक्षकांनी या विषयात अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आध्यक्षीय मनोगतात डॉ. गुरव म्हणाले, कृत्रिम प्रज्ञा हा भीतीचा नसून संधीचा विषय आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने होणारे बदल व तंत्रज्ञानातील प्रगती याबाबत वाणिज्य शिक्षकांनी सजग असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील ७५ प्राध्यापक उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एस. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. केदार मारूलकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर परिषदेचे कार्यवाह डॉ. उदयकुमार शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अमोल सोनावले यांनी केले.