
no images were found
मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल मोठं विधान केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या नेतृत्वात बंडखोरी झाली आणि पक्षात उभी फूट पडली. राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज व ज्येष्ठ नेते अजित पवारांबरोबर गेले. मात्र, अशा परिस्थितीतही जयंता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहणं पसंत केलं. असं असलं तरी काही दिवसांपासून जयंत पाटीलही अजित पवार गटाबरोबर जाण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, “जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्याच्याशी इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे.”
“जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतीमुल्ये पाळणारा माणूस आहे,” असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सूचक विधान केलं.