
no images were found
सोनी मराठीवर ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न ‘ नवी मालिका
मुंबई : आजकाल वेगवेगळ्या विषयाच्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. हलकेफुलके विषय हे नेहमीच प्रेक्षकांना भावतात शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या १२ सप्टेंबर २०२२ पासून सोम – शनि रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या मालिकेची विशेष बाब म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरली ही अशी पहिलीच मालिका आहे.ज्या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे. कोकणातली नयनरम्य दृश्य, हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र अशा स्वर्गसुखाच्या सान्निध्यात ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे, याहून दुसरं नेत्रसुख काय असू शकतं. या मालिकेचं चित्रीकरण कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड या गावात सुरू आहे.
‘शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास, बयोच्या प्रयत्नांना शिक्षणाची आस’ असं ब्रीदवाक्य असलेल्या या मालिकेतनिसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही छोटी बयो तिच्या डॉक्टर होण्याच्या मोठ्या स्वप्नाला कसा आकार देणार, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. या मालिकेत छोट्या बयोची भूमिका बालकलाकार रुची नेरुरकर ही साकारणार आहे. मूळची कोकणातली असलेल्या रुचीचं मालिकाविश्वातलं हे पदार्पण आहे. तर विक्रम गायकवाड, वीणा जामकर, नम्रता पावस्कर, शरद सावंत हेकलाकारही या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर पहिल्यांदाच मालिका विश्वात पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तिच्या अभिनयाची जादू छोट्या पडद्यावर म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवर पाहणं विशेष ठरेल.