no images were found
शिवाजी विद्यापीठातर्फे काळजवडे, सावंतवाडी येथे गावसहभागी मूल्यावलोकन शिबिरांना प्रारंभ
कोल्हापूर (प्रतिनिधी ): शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अधिविभागाच्या समाजकार्य अभ्यासक्रमांतर्गत गावसहभागी मूल्यावलोकन शिबिरांना कालपासून मौजे काळजवडे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) आणि सावंतवाडी (गर्जन ग्रामपंचायत, ता. करवीर, जि.कोल्हापूर) येथे सुरुवात झाली आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरांतर्गत समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी गावांचा सूक्ष्म अभ्यास करून ग्रामविकासास उपयुक्त कार्यक्रम राबविणार आहेत.
गावसहभागी मूल्यावलोकन शिबिरांमध्ये गावातील लोकांच्या सहभागातून गावाच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येते. गावसहभागातूनच गावाचा विकास शक्य आहे, अशी भावना लोकांमध्ये रुजवण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी गावपातळीवर काम करणाऱ्या सर्व संस्थांना भेटी देऊन गावाच्या विकासातील त्या संस्थाचा सहभाग याचा अभ्यास करतील. यामध्ये शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, स्वस्त धान्य दुकान, सहकारी
संस्था, वाचनालय, दुध उत्पादक संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, सहकारी बँक यांना भेटी देतील. तसेच मशालफेरी, ग्रामबैठक व पथनाट्या च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करतील. याचबरोबर गावातील विविध घटकातील नागरिकांसोबत बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना सुचवतील. यामध्ये शेतकरी बैठक, अनुसूचित जाती व जमाती समुदायाची बैठक, जेष्ठ नागरिक बैठक, महिला बैठक, युवक व युवती बैठक, स्वयंसहायता गटाची बैठका घेण्यात येतील. या शिबिरांचा समारोप गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांचा सहभाग वाढवा यासाठी ग्रामसभा घेवून होईल. काळजवडे येथील शिबिराचे समन्वयक डॉ. उमेश गडेकर सहायक संचालक/सहायक प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ हे असून श्रेयश सरदार, श्रीअर्या लोंढे, खंडेराव पाटील, विद्या माने, अंजली बल्लारी, सिमरन आगा, कांबळे गायत्री, अश्विनी कांबळे हे समाजकार्य अभ्यासक्रमाचे विध्यार्थी सहभागी झाले आहेत. सरपंच श्री. शामराव पाटील, उपसरपंच श्री. प्रकाश पाटील, ग्रामसेवक श्री. रामकृष्ण वाघमारे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. तर सावंतवाडी येथील शिबिराच्या समन्वयक डॉ.उर्मिला दशवंत असून शिबिरात प्रिती कांबळे, शाहीन पाटील, स्वाती राऊत, आश्विनी खोत , योगिता मस्कर , पायल कांबळे, प्रेम भोसले , स्वप्निल बारवाडे , गौरव दाभाडे हे समाजकार्याचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.