no images were found
शेतकऱ्यांसाठी आता फक्त एक रुपयात पिक विमा 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर : राज्य सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 'सर्वसमावेशक पिक विमा योजना' सुरु करण्यात केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा उतरता येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिकापासून करण्यात आली आहे. पिकाचा विमा उतरण्यासाठी दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत यंदाचा खरीप हंगाम सन 2023-24 आणि आगामी रब्बी हंगामातील 2025-26 मधील अधिसुचित पिकासाठी ही सर्वसमावेशक पिक विमा योजना (कप अन्ड कॅप मॉडेल 80:110) राबविण्यास मंजूरी देण्यात आली असल्याने जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे व आपल्या पिक संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. दिवेकर यांनी केले आहे. पिक विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या आकस्मिक प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे. सध्या ही योजना केवळ अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसुचित पिकासाठी लागू करण्यात आली आहे. ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी ऐैच्छिक आहे. खातेदार शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुऴाने अगर भाडेपट्याने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे.