no images were found
पर्यावरणशास्त्र विभागात वन्यजीव सप्ताह साजरा
कोल्हापूर (प्रतिनिधी ): १९५२ पासून भारतामध्ये २ ते ८ ऑक्टोबर हा राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. वन्यजीवांप्रती आस्था निर्माण व्हावी आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि वृद्धी व्हावी याकरता हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी’ या व्यापक विषयाच्या अंतर्गत हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त शुक्रवार, दिनांक ६ सप्टेंबर रोजी, विभागाचे संस्थापक व माजी विभागप्रमुख डॉ. जय सामंत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन’ या विषयावर डॉ. जय सामंत यांनी पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘पाणथळ जागा संवर्धन’ या विषयाची आणि त्या अनुषंगाने एकूणच नैसर्गिक साधन संपत्ती, जैवविविधता, वन्य जीवांचे महत्व याबद्दल त्यांनी विवेचन केले.
मानवनिर्मित जलाशय, नैसर्गिक जलाशय, पाणथळ जागांचे महत्व, पाणथळ जागांमधील जैवविविधता या संदर्भातील सखोल माहिती डॉ. जय सामंत यांनी याप्रसंगी बोलताना दिली. जगभरातील विविध परिसंस्था आणि परिसंस्थांच्या विविधतेतून निर्माण होणारी जैव विविधता आणि वन्य जीव यांचे आंतरसंबंध त्यानी यावेळी सांगितले. जगभरातील ३६ जैवविविधता संवेदनशील ठिकाणांपैकी हिमालयाचा पायथा, पश्चिम घाट, इंडो– बर्मा प्रांत आणि अंदमान निकोबार बेटे हे चार प्रमुख भाग भारतामध्ये आहेत. त्यापैकी पश्चिम घाट आपल्या राज्यातून आणि आपल्या जिल्ह्यातून जात असल्याने त्याबद्दल आपल्याला अधिक बारकाईने समजून घेतले पाहिजे असे डॉ. सामंत यांनी सांगितले.
पर्यावरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी प्रास्ताविक केले, सहाय्यक प्राध्यापक डॉ. पल्लवी भोसले यांनी आभार मानले व एम. एस्सी भाग दोन ची विद्यार्थिनी वैष्णवी हिने सुत्रसंचलन केले. व्याख्यानास एम. एसी भाग एक व भाग दोन चे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.