no images were found
तंबाखू नाही म्हणून कोल्हापुरात एकाचा खून
कोल्हापूर – तंबाखू खिशात असतानाही नाही म्हणून सांगितलं. म्हणून खोटं बोलल्याच्या रागातून दोघांनी एकाचा खून केला आहे. लाकडी बांबूने व दगडाने ठेचून हा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शंकर आकाराम कांबळे (वय-55, रा. माळापुडे, ता. शाहुवाडी) असे मृताचे नाव आहे.
ही धक्कादायक घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी उद्यमनगर परिसरात कोटीतीर्थ तलावाजवळ घडली. घरगुती गणेश विसर्जनासाठी नागरिक आज सकाळी घराबाहेर पडत असतानाच सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
आठ दिवसांपूर्वी शंकर कांबळे हे आठ दिवसांपूर्वी कोल्हापुरात आपल्या मुलीकडे आले होते. ते सोमवारी पहाटे कोटीतीर्थ परिसरात फिरत होते. याचदरम्यान, कांबळे यांच्याकडे शुभम शेंडगे आणि रोहित सूर्यगंध या संशयितांनी तंबाखू मागितली. यावर कांबळे यांनी तंबाखू नसल्याचे सांगितले. मात्र, यानंतर संशयित दोघांनी कांबळे यांना पकडले आणि त्यांची अंगझडती घेतली. तर यावेळी कांबळे यांच्या खिशात तंबाखू आढळून आले. यानंतर खोटे बोलल्याच्या रागातून दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच शेजारील दगड व लाकडी बांबू डोक्यात घालून ठेचले. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तेथेच घटनास्थळावरुन पोबारा केला. यात अतिरक्तस्त्रावामुळे कांबळे यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्या भागातून रोहित व शुभम फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यावरून संशयितांचा छडा लागला. याप्रकरणी पोलिसांनी शुभम अशोक शेंडगे (वय-28, रा. यादवनगर) या संशयिताला ताब्यात घेतले. तर पोलीस अजून रोहित अजय सूर्यगंध (वय-27, रा. यादवनगर) या संशयिताचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.