
no images were found
इंडियन आयडॉलचा भारतीय संगीत उद्योगावर सखोल प्रभाव आहे -कुमार सानू
‘एक आवाज, लाखों एहसास’ हे इंडियन आयडॉल 14 चे वेधक थीम आहे, जे प्रेक्षकांच्या हृदयात विविध भावना जाग्या करण्याची क्षमता असणाऱ्या जादुई आवाजांवर प्रकाशझोत टाकते. या सत्रात बॉलीवूडचा मेलडी किंग कुमार सानू याचे परीक्षक म्हणून पदार्पण होत असल्यामुळे या लाडक्या शोची मौलिकता आणखी वाढणार आहे. श्रेया घोषाल आणि विशाल दादलानी या सह-परीक्षकांसोबत कुमार सानू स्पर्धकांच्या परफॉर्मन्सवर आपला अभिप्राय देईल, ज्यामुळे त्यांच्यातील प्रतिभेचा विकास होण्यास मदत होईल. या सीझनबाबतची आपली उत्सुकता आणि संगीत क्षेत्रातील आपला प्रवास याबद्दल सदाबहार गायक कुमार सानूने दिलखुलास गप्पा मारल्या, त्याचा हा अंश.
1.या सीझनमध्ये परीक्षक म्हणून दाखल होण्यामागे काय प्रेरणा होती?
इंडियन आयडॉलच्या सेटवर मी सेलिब्रिटी अतिथी आणि परीक्षक म्हणून बऱ्याच वेळा आलो आहे. पण या संपूर्ण सीझनसाठी परीक्षक म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती. आपल्या देशातील काही अत्यंत प्रतिभावान आणि असामान्य गायकांना लोकांपुढे आणण्यात या प्रतिष्ठित मंचाचा मोठा वाटा आहे
2.संगीत क्षेत्रात तुझी वाटचाल प्रदीर्घ आहे. या सत्रातील इंडियन आयडॉलमध्ये आलेल्या स्पर्धकांकडून तुला कोणत्या गुणांची अपेक्षा आहे?
भारतीय संगीत उद्योगात इतकी वर्षे काम करण्याचा माझा अनुभव फारच छान होता. अनेक संधी माझ्याकडे चालून आल्या, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
3.स्पर्धकांना निराश न करता त्यांना सकारात्मक अभिप्राय तू कसा देशील?
स्पर्धकाच्या आतील प्रतिभेचा विकास होण्यासाठी त्याला परखड पण सकारात्मक अभिप्राय देणे आवश्यक आहे. त्याला आधार देतानाच मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे अभिप्राय देणे मी पसंत करीन. एक परीक्षक म्हणून त्यांच्या बलस्थानांकडे मी विशेष लक्ष देईन आणि सुधारणेसाठी संधी खुल्या करून देईन. संगीत हा आजीवन शिकत राहण्याचा प्रवास आहे. या मार्गात मी त्यांच्या सोबतीस असेन.
4.गेल्या अनेक वर्षांमध्ये इंडियन आयडॉलमधून काही उत्कृष्ट गायक जन्माला आले आहेत. इंडियन आयडॉलसारखे मंच भारतीय संगीत उद्योगात कसे योगदान देतात यावर आपले विचार शेअर करशील का?
इंडियन आयडॉलचा भारतीय संगीत उद्योगावर सखोल प्रभाव आहे. देशातील छुप्या प्रतिभांना चमकण्याची आणि पुढे येण्याची संधी हा मंच देतो. गेल्या काही वर्षांमध्ये या मंचाने केवळ उत्तम गायक दिले नाहीत, तर या गायकांना मोठा श्रोतृवर्ग देखील मिळवून दिला आहे.
5.आपल्या कारकिर्दीत तू अनेक प्रतिभावान गायक आणि संगीतकारांसोबत काम केले आहेस. या प्रवासातील काही लक्षणीय अनुभव आपल्या स्पर्धकांशी तू शेअर करशील का?
माझ्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले. या स्पर्धकांना मला जी सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवावीशी वाटते, ती म्हणजे परिश्रम आणि निष्ठा यांचे मोल! केवळ प्रतिभेमुळे तुम्ही अधिक लांब जाऊ शकणार नाही.
6. आता तीनपैकी एक परीक्षक तू झाल्यानंतर इंडियन आयडॉलच्या या सत्राकडून प्रेक्षक काय अपेक्षा ठेवू शकतात?
इंडियन आयडॉलचे हे सत्र खऱ्या अर्थाने ‘म्युझिक का सबसे बडा त्योहार’ असणार आहे. प्रेक्षकांसाठी या शोमध्ये सुमधुर संगीत, भावनिक क्षण आणि भरपूर मनोरंजन असणार आहे. यंदाच्या कलाकारांमधील अचाट प्रतिभा पाहून तर मी स्वतः थक्कच झालो आहे,
7.शेवटी, संगीत क्षेत्रात काही मोठी कामगिरी करण्याचे स्वप्न उरी बलागणाऱ्या सर्व होतकरू गायकांना तू काय संदेश देशील?
सगळ्या होतकरू गायकांना मी एकच सल्ला देईन की, स्वतःवर आणि स्वतःला मिळालेल्या कलेच्या वरदानावर विश्वास ठेवा. कठोर परिश्रम करा आणि निरंतर शिकत रहा, आपल्या कामात सातत्य आणि चिकाटी ठेवा. हा व्यवसाय तितकासा सोपा नाही. पण दृढ निर्धार आणि संगीताबद्दल खरेखुरे प्रेम असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणीवर मात करू शकाल. हृदयापासून गात रहा, तुम्हाला नेहमी उत्साह आणि जोम वाटेल!