
no images were found
सचिन तेंडुलकरवर ICC ने सोपवली मोठी जबाबदारी
नवी दिल्ली : वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होण्यासाठी आता फक्त दोन दिवसांचा अवधी उरला आहे. पण या कमी वेळेत आयसीसीने भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
आयसीसीने (ICC)भारताचा महान खेळाडू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी जागतिक राजदूत म्हणून घोषित केले आहे. एकदिवसीय सामन्याची ही स्पर्धा सुरू होण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी असताना आयसीसीने ही मोठी घोषणा केली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सचिनने अमूल्य योगदान दिले आहे, त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे. सचिन हा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील उद्घाटन सामन्यापूर्वी विश्वचषक ट्रॉफीसह बाहेर पडेल आणि स्पर्धेचे उद्घाटन झाले असे घोषित करेल.
याबाबत सचिन तेंडुलकर म्हणाला: ” भारतात जेव्हा प्रथम वर्ल्ड कप झाला त्यावेळी १९८७ साली मी बॉल बॉय होतो. पण त्यानंतर मी सहा वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करू शकलो. वर्ल्ड कपचे माझ्या मनात नेहमीच एक वेगळे स्थान आहे. २०११ साली भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि हा माझ्या क्रिकेट प्रवासातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे. यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. मीदेखील या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहे. युवा मुलां मुलींसाठी हा वर्ल्ड कप प्रेरणादायक ठरेल आणि त्यांना या स्पर्धेतून बरेच काही शिकता येईल. त्यामुळे ही स्पर्धा युवा पिढीसाठी महत्वाची आहे. सर्वच संघातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील, अशी मला आशा आहे.”
या वर्ल्ड कपची सुरुवात ५ ऑक्टोबरला होणार आहे. या वर्ल्ड कपमधील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन देशांत होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण ४८ सामने खेळवले जातील. हे ४८ सामने १० ठिकाणी खेळवण्यात येतील. या वर्ल्ड कपचा अंतिम फेरीचा सामना हा १९ नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियम येथेच होणार आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये कोण विजेता ठरणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.