no images were found
‘सा रे ग म प’तील स्पर्धक कार्तिक गाणार हिमेश रेशमियाने संगीत दिलेले गाणे
गतवर्षीच्या आवृत्तीच्या उदंड यशानंतर ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प’ या गायनविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाचे दणक्यात पुनरागमन झाले असून त्यात हिमेश रेशमिया, नीति मोहन आणि अनु मलिक हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करणार आहे. ‘सा रे ग म प 2023’च्या अंतिम 12 स्पर्धकांमध्ये समावेश होण्यासाठी देशभरातील अनेक होतकरू इच्छुकांच्या सुरेल ऑडिशन्सनी या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला असला, तरी काही स्पर्धकांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याबद्दलच्या प्रेमाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवाय ही स्पर्धा संपण्यापूर्वीच झी म्युझिकच्या यू-ट्यूब वाहिनीवर काही निवडक स्पर्धकांना त्यांचे स्वत:चे स्वतंत्र गाणे प्रदर्शित करण्याची संधी ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाने प्रथमच दिली आहे. या विशेष भागातील कार्तिकचे गाणे विलक्षण प्रभावी असले, तरी अन्य स्पर्धकांनी गायलेली अशीच अप्रतिम गाणी ऐकण्यास सज्ज व्हा.
आगामी ग्रॅण्ड प्रीमिअर भागात प्रेक्षकांना कार्तिककुमार कृष्णमूर्तीने बहारदारपणे गायलेल्या ‘केसरिया’ या गाण्याची जादू अनुभवायला मिळेल. कार्तिक हा चेन्नईचा रहिवासी असून तो ऑटिझम विकाराने ग्रस्त आहे. त्यामुळे दुसर््याशी संपर्क साधताना आणि लोकांचे म्हणणे समजावून घेताना त्याला अडचण येते. तरीही त्याने या अडचणींवर मात करून एक थक्क करणारे गाणे गायले. त्याला अशा प्रकारे अफलातून पध्दतीने गाताना पाहून सर्वजण थक्क झाले. इतकेच नाही, तर जेव्हा नामवंत संगीतकार आणि पार्श्वगायक हिमेश रेशमिया याने त्याला आपल्या स्टुडिओत त्याचे स्वतंत्र गाणे ध्वनिमुद्रित करण्याची संधी दिली.
हिमेश रेशमिया म्हणाला, “कार्तिक, तू एक दुर्मिळ आणि मूल्यवान गायक आहेस. तुझ्या आवाजात दैवी शक्ती आहे जी स्पष्ट करता येणार नाही. तू जेव्हा गातोस, तेव्हा समोरच्या श्रोत्याच्या थेट हृदयाला स्पर्श करतोस. तू जेव्हा जेव्हा गातोस, तेव्हा तेव्हा समोरच्याचं लक्ष तू आपल्याकडे वेधून घेतोस आणि अशा श्रोत्यांपैकी मी एक आहे, हे मी कबूल करतो. तुझ्या आवाजाने मलाही प्रेरणा दिली आहे. मी तुला आणि तुझ्या पालकांना पुढील आठवड्यात माझ्या स्टुडिओत येण्याचं आमंत्रण देतो आहे. तिथे आपण तुझं नवं गाणं ध्वनिमुद्रित करू. कार्तिक, मी तुझं अभिनंदन करतो. तुझ्या पहिल्याच गाण्याचं ध्वनिमुद्रण पुढच्या आठवड्यात होणार असून केवळ एका महिन्यात ते गाणं प्रसिध्द केलं जाईल. मी स्वत: त्याला संगीत देईन.”