no images were found
भीमा कृषी प्रदर्शनास प्रारंभ मेरी वेदर मैदानावर गोलू २ आणि प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी झाली होती गर्दी
कोल्हापूर/प्रतिनिधी : देश आर्थिक दृष्ट्या महासत्ता बनवायचा आहे यासाठी शेती क्षेत्र सर्वात मोठे क्षेत्र आहे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे असे उदगार वैद्यकिय शिक्षण मंत्री व विशेष सहाय्य तथा कोल्हापूरचे पालकमंत्री ना.हसनसो मुश्रीफ यांनी मेरी वेदर मैदान येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व भव्य अशा भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटप्रसंगी काढले.भीमा कृषी प्रदर्शनाच्या प्रवेशद्वार जवळ ना.हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक व अन्य उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून तसेच श्रीफळ वाढवून शानदार शुभारंभ करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील मा. आमदार अमल महाडिक,भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हाध्यक्ष भाजपा विजय जाधव, पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, कोल्हापूर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष व सौ.रुपाराणी निकम,व्हाईस प्रेसिडेंट कार्पोरेट अफेयर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे श्री. सत्यजित भोसले,भागीरथी महिला संस्था अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे,माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्याजीत नाना कदम पृथ्वीराज महाडिक आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.हसनसो मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झालेला आहे तरीही आपले पूर्वज शाहू महाराज यांनी पुरेसे पाणी मिळेल याची सोय राधानगरी धरणाच्या माध्यमातून करून ठेवली आहे या पाण्याचा उपयोग करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधून जास्तीचे उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्रयत्नशील राहणे व एकरी उत्पादन वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस सोयाबीन भात काजू यात ही पिके वाढविणे आवश्यक आहेत.शेती परवडणारी नाही असे सध्या चित्र आहे मुली मिळत नाहीत त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कशा पद्धतीने केली पाहिजे याचे ज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे त्यासाठी हे भीमा कृषी प्रदर्शन त्यांना प्रबोधनाचे एक माध्यम आहे असे सांगितले.साखरेचे दर कमी झालेले आहेत साखर कारखानदारी सध्या अडचणीत आहे.साखरेची विक्री होत नसल्याने मोठे संकट उभे आहे.यासाठी आपण प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे असेही सांगितले.
यावेळी बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणीसाठा भरपूर आहे या पाण्याचा वापर करून चांगली शेती करावी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तरुणांनी शेतीकडे वळावे.लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे त्यामुळे शेतीचे तुकडे होत आहेत उत्पादन घेण्यात अडचणी निर्माण होणार आहेत यासाठी तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी आणि शेती अभ्यासावर अधिक भर देणे आवश्यक आहे असे सांगितले. यासाठी आपण प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करूया साखर जीवनावश्यक वस्तू नाही त्याला बाजूला ठेवा साखरेला जीवनावश्यक म्हणून मान्यता देऊ नये अशी सरकारकडे मागणी करूया असे पालकमंत्री मुश्रीफ यांना सांगितले. शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणेही काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी शेती हा भविष्यामध्ये शेती हा एक नंबरचा व्यवसाय राहणार आहे हा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती शेतीकडे वळणे आवश्यक आहे असे सांगितले.आज शेतकऱ्यांची मुले शेतीऐवजी दुसरे क्षेत्र निवडत आहेत त्यांना या शेतीच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे.जमीन हवी आहे मात्र शेतकरी मुलगा लग्नासाठी नको अशी मानसिकता तयार होत चालली आहे.त्यामुळे शेतकरी मुलांचे लग्न होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.म्हणूनच शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतीत नव्या तंत्रज्ञान वापर करून शेती करण्यावर भर द्यावा, काळ बदलत चालला आहे हे ओळखून कृषिला महत्व देत आराखडा तयार केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी आपल्या प्रास्तविक पर मनोगतात खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे.नवीन ज्ञान तंत्रज्ञान, मशिनरी यंत्रे यांची माहिती भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाते याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे आवाहन केले.गोलू २ रेडा हा या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.त्याचबरोबर या प्रदर्शनात अन्य काही जातिवंत जनावरे आणण्यात आली आहेत ते पाहून शेतकऱ्यांनी आपल्या ठिकाणी असणाऱ्या जनावराचे पालन करावे.आणि गोलू ३ आपल्याकडे निर्माण होईल अशी असा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे सांगितले.शेती बरोबरच शेतकऱ्यांनी मत्स्य पालन,रेशीम उद्योग,बांबू उद्योग असे नवनवीन जोडधंदे शेतकऱ्यांनी सुरू करावेत असे सांगितले.प्रधानमंत्री यांनी विकसित भारत करण्याचा संकल्प केला आहे.आता भारताचा २७ वा क्रमांक आहे तो २०२७ , पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर आणायचा आहे यासाठी शेतकऱ्याला सहा हजार अनुदान वर्षाला दिले जात आहे.यासाठी को ऑप सोसायट्यांना कर्ज देऊन त्याची वसुली करण्याचे काम दिले आहे.त्यात २७ प्रकारची उद्दीष्टे सोसायट्यांना दिलेली आहेत त्यांच्याकडून काम केले जात आहे त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागत कृष्णराज महाडिक यांनी केले.आभार भीमा सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विश्र्वराज महाडिक यांनी मानले. उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता अंतरंग निर्मित ‘गंध मातीचा ‘ हा शेतकरी गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला. यात फड सांभाळ तुर्यालां ग आला,तुझ्या उसाला लागल कोल्हा,कांदा मुळा भाजी,झुंजू मंजू पहाट झाली.चिंब पावसानं रानं झाली अभाळणी,मेरी देश की धरती अशी दर्जेदार गाणी सादर करण्यात आली.मेरी वेदर मैदानावर गोलू २ आणि प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी झाली होती. आज पहिल्याच दिवशी तांदूळ,सेंद्रिय गूळ,हळद,नाचणी,शेतीची अवजारे, अन्य साहित्य याची मोठी विक्री झाली.