no images were found
अभिनेता गोविंदाची चौकशी होणार
भुवनेश्वर :- ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता गोविंदाची चौकशी होणार आहे. एक हजार कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी करण्यात येणार आहे. क्रिप्टोच्या नावाखाली सोलर टेक्नो अलायन्सची पॉन्झी योजना होती.
कंपनीने दोन लाख लोकांकडून एक हजार कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. गोविंदाने प्रमोशनल व्हिडीओमध्ये या कंपनीचं समर्थन केल्याचा आरोप आहे. सोलर टेक्नो अलायन्स हे अनेक देशांमध्ये ऑनलाइन उपलब्ध असून क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ऑनलाइन पॉन्झी योजना चालवत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आम्ही गोविंदाच्या चौकशीसाठी लवकरच मुंबईला एक टीम पाठवू. त्याने जुलै महिन्यात गोव्यात पार पडलेल्या या कंपनीच्या मोठ्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याचप्रमाणे काही व्हिडीओमध्ये त्यांनी कंपनीची प्रसिद्धी केली होती”, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर जनरल जे. एन. पंकज यांनी दिली.
सध्या तरी गोविंदा याप्रकरणी संशियत किंवा आरोपी नाही. त्याची नेमकी भूमिका काय होती हे चौकशीनंतरच स्पष्ट होऊ शकेल. त्याची भूमिका फक्त प्रसिद्धी आणि जाहिरातीसाठीच मर्यादित होती असं निष्पन्न झाल्यास आम्ही त्याला या प्रकरणात साक्षीदार बनवू, असंही ते पुढे म्हणाले.
या ऑनलाइन पॉन्झी योजनेअंतर्गत रिझर्व्ह बँक इंडियाकडून कोणत्याही अधिकृततेशिवाय देशातील दोन लाखांहून अधिक लोकांकडून एक हजार कोटी रुपये गोळा करण्यात आले, असंही ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेनं सांगितलं. या कंपनीच्या विविध प्रमोशनल व्हिडीओंमध्ये अभिनेता गोविंदाने त्यांची प्रसिद्धी केली होती. म्हणूनच या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी गोविंदाची चौकशी होणार आहे