no images were found
ऋषी सुनक यांची गळाभेट, जो बायडन यांना दाखवली भारताची संस्कृती
आजचा दिवस G20 संघटनेसाठी आणि खास करून भारत देशासाठी महत्वाचा आहे. G20 परिषदेची आजपासून सुरुवात झाली आहे. या परिषदेसाठी जगभरातील महत्वाच्या देशांचे राष्ट्रप्रमुख राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. या नेत्यांच्या स्वागतासाठी जिथं ही परिषद होत आहे त्या भारतमंडपात खास सोय करण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या नेत्यांचं खास स्वागत केलं. या स्वागतावेळी भारत आणि इतर देशांचं नातं कसं आहे याचं द्योतक दिसलं. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं खास शैली स्वागत केलं.
ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. त्याच देशाच्या प्रमुखपदी सध्या भारतीय वंशाची व्यक्ती आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. उद्योगपती नारायण मूर्ति आणि सुधा मूर्ति यांचे ते जावई आहेत. ऋषी सुनक यांचं भारतात येणं अनेक अर्थाने खास आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ऋषी सुनक पहिल्यांदाच भारतात आले. त्यामुळे त्यांचं काल विमानतळावरही स्वागत झालं. तर आज भारतमंडपात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. यावेळी दोघांनी एकमेकांना प्रेमाची मिठी मारली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं. G-20 परिषदेसाठी विविध राष्ट्रप्रमुखांचं स्वागत पंतप्रधान मोदी जिथे करत आहेत तिथे पाठीमागे सूर्य मंदिर, कोणार्कची प्रतिमा उभारण्यात आली आहे. ही प्रतिमा नरेंद्र मोदी यांनी बायडन यांना दाखवली. त्यांना ही भारताची संस्कृती दाखवली. बायडन जेव्हा बैठकीच्या ठिकाणाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा मोदींही त्यांच्यासोबत काही पावलं चालले. ही कृती भारत आणि अमेरिका संबंधांमधील घनिष्टता दाखवते.
भारतात होणाऱ्या G-20 परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. आफ्रिकन युनियन आता या G-20 आंतरराष्ट्रीय समूहाचा कायमस्वरूपी सदस्य बनणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेमध्ये बोलताना म्हटलं आहे. युरोपीय युनियन पाठोपाठ आता आफ्रिकन युनियन पण G-20 समूहाचा भाग बनणार आहे.