
no images were found
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ईव्हीएम मशिनबाबत जनजागृती मोहिम
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती तयारी सुरु आहे. याचसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम ) नागरिकांच्या असणाऱ्या शंका दूर करण्यासाठी तसेच मतदारांना या मशिनबाबत माहिती देण्यासाठी जनजागृती मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने ठिकठिकाणी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मतदान यंत्र सुरक्षित असल्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या यंत्राबाबत काही प्रश्न असल्यास त्यांचे निराकरणही तज्ज्ञांमार्फत केले जात आहे. फिरत्या वाहनातून शहर व गावोगावी ही मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक मतदारसंघात दोन फिरती वाहने आणि एका कायमस्वरुपी केंद्रामार्फत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली आहे.
जिल्ह्यात या जनजागृती मोहिमेला १० डिसेंबरपासून सुरुवात झाली असून ही मोहिम २९ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यावेळी नागरिक मतदानाचे प्रात्यक्षिक करुन व्हीव्ही पॅटद्वारे त्याची नोंद योग्य प्रकारे झाली आहे का, याची पडताळणी करु शकणार आहेत. निवडणूक आयोगाने प्रशासकीय यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन जनजागृतीचा मार्ग अवलंबला आहे. पुढील दोन महिने शहर व ग्रामीण भागातील मुख्य चौक व बाजारपेठांच्या ठिकाणी फिरत्या वाहनातून मतदार यंत्रांचे प्रा्त्यक्षिक सादर केले जाणार आहे.
या काळात या विषयी जनजागृती करणारे एक माहिती केंद्र कायमस्वरुपी कार्यान्वित असणार आहे. या ठिकाणी या यंत्राबाबत तांत्रिक माहिती असलेला कर्मचारी उपस्थित राहणार आहे. या केंद्रामध्ये राजकीय पक्ष व मतदार आपल्या प्रश्नांचे निराकरण करु शकतील. या ईव्हीएम मशीन मधील बॅलेट युनिट वर सांकेतिक चिन्हे आहेत. ज्या चिन्हासमोरचे बटन आपल्याकडून दाबले जाईल त्याच चिन्हाची चिट्ठी व्हीव्हीपॅट मशीन च्या स्क्रीन वर दिसते. या मोहिमेदरम्यान मतदान केंद्रावर चालणाऱ्या मतदान प्रक्रियेबद्दल देखील माहिती देण्यात येत आहे. या प्रात्यक्षिकांचा लाभ घेऊन नागरिकांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) माहिती घ्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.