Home सामाजिक घुसखोरीवरुन चीनला भारताने परखड इशारा देण्याची गरज: डॉ. यशवंतराव थोरात

घुसखोरीवरुन चीनला भारताने परखड इशारा देण्याची गरज: डॉ. यशवंतराव थोरात

13 second read
0
0
34

no images were found

घुसखोरीवरुन चीनला भारताने परखड इशारा देण्याची गरज: डॉ. यशवंतराव थोरात

कोल्हापूर : भारत शांतताप्रिय देश आहे, हे खरे; मात्र घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, असा परखड शब्दांत चीनला इशारा देण्याचीही गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा विचारवंत डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘भारत-चीन संबंध’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात बीजभाषण करताना ते बोलत होते. विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर होते.

डॉ. यशवंतराव थोरात यांनी आपल्या बीजभाषणामध्ये भारत व चीन यांच्यातील १९५० ते १९६२ या कालावधीतील सहसंबंधांचा सूक्ष्म वेध घेतला. ते म्हणाले, नवस्वतंत्र व प्रजासत्ताक अशा भारत व चीन यांच्यात १९५०मध्ये सुरवातीला मैत्रीपूर्ण संबंध राहिले. ‘हिंदी-चीनी भाई भाई’ म्हणण्याइतपत ही मैत्री होती. साम्राज्यवादी व वसाहतवादी सत्तेशी झगडून त्यांचे वर्चस्व झुगारून देऊन स्वातंत्र्य मिळविण्यात हे देश यशस्वी ठरले. त्या काळात आशिया आणि आफ्रिका खंडांतील अन्य देशही स्वतंत्र होत होते. त्यांचे नेतृत्व भारत व चीन करीत होते, मात्र त्यांचे हेतू मात्र वेगवेगळे होते. पंडित नेहरू आणि माओ या दोन बलाढ्य व्यक्तीमत्त्वांमधून उद्भवलेला संघर्ष प्रत्यक्ष जीवनात प्रतिबिंबित झाला. त्यामध्ये १९५५ च्या बांडुंग परिषदेत नेहरूंनी माओ व चीनचा परिचय करून देण्याचे केलेले धार्ष्ट्य, ज्या तिबेटशी भारताचे दोन हजार वर्षांचे धार्मिक संबंध होते, त्यावर केलेले अतिक्रमण, १९६० मध्ये दलाई लामांचे तिबेटकडून भारताकडे पलायन आणि त्यांचा पाठलाग करीत चीनी सैनिकांची भारतात घुसखोरी अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन संबंधात कटुता येत जाऊन अखेरीस भारतावरील आक्रमणापर्यंत येऊन पोहोचले. यामागे चीनची विस्तारवादी सत्तालोलुपताही कारणीभूत आहे. या युद्धातील पराभव आपल्याला आजही झोंबणारा आहे. त्यावेळी आपल्या सैनिकांकडे शौर्य व धैर्याची कमतरता नव्हती. मात्र शस्त्रसामग्री व साधनांची कमतरता निश्चित होती. लोकशाहीत लष्कर हे एक साधन असते. त्याकडे १९५० ते १९६२ या काळात आपले अक्षम्य दुर्लक्ष्य झाले. त्यावेळी आपले अपयश युद्धातील नव्हते, तर ते आपल्या देशाचे आणि आपल्या परराष्ट्र धोरणाचे अपयश होते.

डॉ. थोरात पुढे म्हणाले, भूतकाळापासून धडा घेऊन आपण पुढे जायला हवे. चीन व पाकिस्तान हे केवळ आंतरराष्ट्रीय सहकारी नाहीत, तर मित्र आहेत. त्यांच्या आपापल्या महत्त्वाकांक्षा आहेत. चीनच्या भू-राजकीय महत्त्वाकांक्षा तर प्रचंड आसुरी आहेत. भारतीय नियंत्रण रेषा उल्लंघून आत शिरण्यासाठी ते सातत्याने संधींच्या शोधात आहेत. त्यामुळे त्यांना सज्जड इशारा देण्याची आवश्यकता आहे. या इशाऱ्यामध्येही पुन्हा युद्धाच्या शक्यता आहेतच. पण, युद्ध हे सैन्याकडून लढले जात असले, तरी घडविले जाते ते नागरिकांकडून, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. शांततेची किंमत व कदर अन्य कोणाही पेक्षा जवानांना असते. युद्धात ते देह ठेवतात, ते तुमच्या-आमच्या जीवनात शांतता नांदावी, यासाठी. या बाबीचे भान ठेवून आपण आंतरराष्ट्रीय संबंधात पुढे जायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. अशोक चौसाळकर यांनी डॉ. थोरात यांच्या सटीक मांडणीचे कौतुक केले. ते म्हणाले, डॉ. थोरात यांनी मांडलेल्या दृष्टीकोनाशी अभ्यासकांचे मतभेद होण्याची शक्यता गृहित धरल्यानंतरही तिचे महत्त्व उरते. १९६२च्या युद्धाची त्यांनी उलगडून दाखविलेली पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. अवघे दहा टक्के सैन्यबळ आणि अपुरी युद्धसामग्री वापरून लढल्या गेलेल्या या युद्धात आपला अल्पकाळासाठी पराभव झाला. पराभवाचे दुःख असले तरी भारत पुनश्च मुसंडी मारुन त्यामधून बाहेर पडला, हेही वास्तव आहे. तत्कालीन नेतृत्वाचे ते अपयश आणि यशही ठरले, याकडेही त्यांनी निर्देश केला.

यावेळी मंचावर कर्नल शिव कुणाल वर्मा, डॉ. राहुल त्रिपाठी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्रीराम पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार उपस्थित होते. नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जयश्री कांबळे यांनी परिचय करून दिला. नेहा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले.

उद्घाटन सत्रानंतर चर्चासत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सत्रे पार पडली. यामध्ये ‘भारत-चीन संबंध’ या विषयावर कर्नल शिव कुणाल वर्मा यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीराम पवार होते. दुसऱ्या सत्रात डॉ. राहुल त्रिपाठी व डॉ. सुखदेव उंदरे यांनी ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयावर मांडणी केली. डॉ. प्रल्हाद माने सत्राध्यक्ष होते. तिसऱ्या सत्रात डॉ. अशोक चौसाळकर ‘भारत-चीन संबंधांतील समकालीन प्रवाह’ या विषयावर मांडणी केली. डॉ. भारती पाटील सत्राध्यक्ष होत्या. श्रीराम पवार आणि डॉ. रविंद्र भणगे यांच्या उपस्थितीत समारोप सत्र संपन्न झाले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम

पर्यावरण संवर्धनासाठी नव्या पिढीचा सक्रीय सहभाग गरजेचा– सिद्धेश कदम कोल्हापूर/ प्रतिनिधी:-…