no images were found
सुशिक्षित बेरोजगार नव-उद्योजकांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळावा
कोल्हापूर : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला व नव-उद्योजकांसाठी “उद्योजकता विकास मार्गदर्शन व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सीएमईजीपी) अंतर्गत कर्ज प्रस्ताव मार्गदर्शन मेळावा” सोमवार दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता “उद्योग भवन सभागृह, तळमजला, उद्योग भवन, महावीर गार्डन समोर कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्राम उद्योग मंडळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा उद्योग भवन, कोल्हापूर यांच्यावतीने हा मेळावा होणार आहे. कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यातील तरुण व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला व नवउद्योजकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्याबाबत मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या तरुण पिढीला स्वतःचा उद्योग व्यवसाय निवड करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. त्यामध्ये उद्योग संधी, उद्योगाची निवड, उद्योगासाठी लागणारे भांडवल, शासनाच्या विविध कर्ज व अनुदान विषयक योजना त्यासाठी लागणारी कागदपत्रे, प्रकल्प अहवाल व बँकेची भूमिका इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/fw9XJeNdzWMatLk49 या गुगललिंकवर नाव नोंदणी करावी.
मार्गदर्शन मेळाव्या मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील युवक-युवती, महिलांसाठी मोफत व विद्यावेतनासह असलेल्या कॉम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग-फूड प्रॉडक्ट ॲण्ड मसाले मेकिंग, हेअर अँड स्किनकेअर (ब्युटीपार्लर), ग्राफिक्स डिझायनिंग, कॉम्प्युटर टॅली विथ जीएसटी, तसेच विशेष घटक योजना अंतर्गत अनुसुचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीं करिता कॉम्प्युटर टॅली विथ जीएसटी, अॅटोमोबाईल दुचाकी वाहन दुरुस्ती, मोबाईल रिपेअरिंग, रेडीमेड गारमेंट मेकिंग, होम सायन्सवर आधारीत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येऊन इच्छुकांचे प्रवेश अर्ज भरुन घेतले जाणार आहेत.
कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला व नव-उद्योजकांनी मेळाव्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (सी.एम.ई.जी.पी.) अंतर्गत कर्ज व अनुदान तसेच मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे यांच्याशी संपर्क साधावा.