no images were found
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 80 अमृत सरोवरांवर झेंडावंदन
कोल्हापूर : जिल्ह्यात 80 अमृतसरोवरांची निर्मिती झाली असून या अमृत सरोवरांवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. याठिकाणी स्वातंत्र्य सैनिक, वीरजवान, शहीद जवान यांच्या पत्नी, आई, जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाल्याची माहिती जलसंधारण अधिकारी बी.व्ही.आजगेकर यांनी दिली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी “मिशन अमृत सरोवर” योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर निर्माण करण्याबाबत आवाहन केले होते. जिल्ह्यात 15 ऑगस्ट 2022 पासून या अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु असून 17 अमृत सरोवर निर्माण करुन ध्वजवंदन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण 92 अमृत सरोवरांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यामध्ये आजरा 15, भुदरगड 7, चंदगड 9, गडहिंग्ज 7, हातकणंगले 2, कागल 5, करवीर 9, पन्हाळा 5, राधानगरी 6, शाहुवाडी 27 अशी सरोवरांची संख्या आहे. यामध्ये नवीन तलावांची निर्मिती करणे, अस्तित्वातील तलावांची दुरुस्ती करणे, साठवण क्षमता वाढविणे या बाबींचा समावेश आहे.
82 पैकी एकूण 80 अमृतसरोवरांची निर्मिती करुन, केंद्र शासनाकडून दिलेल्या 75 अमृतसरोवरांच्या निर्मिती उद्दिष्टांपेक्षा जिल्ह्यात अधिकचे सरोवर पूर्ण केले आहेत. उर्वरित 12 अमृत सरोवर नवीन तलावांची निर्मिती असून सदरची कामेही प्रगतीपथावर आहेत.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व लोकसहभागामुळे उद्दिष्ट्य साध्य झाले असून उर्वरीत कामेही लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. या अभियानात जलसंधारण विभागाकडून 88 अमृतसरोवर तर वनविभागामार्फत 4 अमृत सरोवरांची कामे पाहिली जात आहेत.
अभियानासाठी सरोवर 1 एकरमध्ये व पाणीसाठा 10 हजार घ.मी. इतका असणे आवश्यक होते. त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये 92 अमृत सरोवरांमार्फत 265.32 लक्ष घ.मी. पाण्याचे संवर्धन केले जाणार आहे.
यावर्षीही जिल्हयातील अमृत सरोवर ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. हे अभियान राबविण्यासाठी प्रत्येक अमृत सरोवरासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधी, शासन प्रतिनिधी, तसेच स्वातंत्र्य सैनिक, वीरजवान, शहीद जवान यांच्या पत्नी, आई, जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन केले होते. हे अभियान राबविण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तसेच सदस्य सचिव जिल्हा जलसंधारण अधिकारी आहेत. हे अभियान राबविण्यास जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार यांचे मार्गदर्शन व जलसंधारण विभागाचे काटेकोर नियोजन पूरक ठरले असल्याची माहिती जलसंधारण अधिकारी बी.व्ही. आजगेकर यांनी दिली आहे.