no images were found
स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून साकारलेले स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी युवकांवर: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने
कोल्हापूर: भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे. ते स्वातंत्र्य टिकविणे ही आजच्या तरुणांची व भावी पिढ्यांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव भुजंगराव माने यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या ‘शिव-वाणी’ या युट्यूब ध्वनीवाहिनीवरुन गेल्या १५ ऑगस्ट २०२२पासून दररोज सकाळी ९ वाजता सलग वर्षभर प्रसारित करण्यात आलेल्या ‘अभिवादन स्वातंत्र्यसैनिकांना’ या ध्वनीमालिकेचा समारोप आज येळावी (ता. तासगाव, जि. सांगली) येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक माने यांचा विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याचा संदर्भ देऊन माने आपल्या मनोगतात म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने केलेला माझा सत्कार हा मी स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या आणि झटलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाच्या वतीने अत्यंत विनम्रतापूर्वक स्वीकारतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही १९४२च्या आंदोलनात सहभागी झालो. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारही यशस्वी करून दाखविले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झटणारी आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते राखणारी माणसं तयार केली. भारताचे स्वातंत्र्य फार कष्टातून साकारलेले आहे. ते टिकविण्याची जबाबदारी तरुण खांद्यावर आहे. त्यांनी त्यासाठी पराकाष्ठा करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांनी आपल्या तल्लख स्मरणशक्तीच्या जोरावर वयाच्या ९९व्या वर्षीही स्वातंत्र्यलढ्याच्या व प्रतिसरकार आंदोलनाच्या अनेक आठवणी सांगून उपस्थित तरुणांना रोमांचित करून सोडले.