no images were found
सीमा भागातील विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाची संधी : डॉ.संजय कुबल
बेळगाव : दूरशिक्षणाच्या माध्यमातून सीमा भागातील विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्चशिक्षणाची सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील उपकुलसचिव डॉ.संजय कुबल यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने बेळगाव येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार श्री. प्रकाश मरगळे होते. यावेळी खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार श्री. दिगंबर पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य श्री. एम. जी. पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते.
डॉ. संजय कुबल म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेहमीच सीमा भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असेल. तसेच दूरशिक्षण अंतर्गत दुहेरी पदवीचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री.मालोजी अष्टेकर म्हणाले की,शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्गत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची सुवर्णसंधी आपल्या दारी आली आहे, त्याचा लाभ सीमा भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.तसेच यावेळी डॉ.चांगदेव बंडगर, डॉ.सचिन भोसले, डॉ.मुफीद मुजावर व डॉ.सुशांत माने यांनी बी.ए.,बी.कॉम.,एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी, राज्यशास्त्र , अर्थशास्त्र, समाजशास्त्र व इतिहास), एम.कॉम.,एम एस्सी.(गणित) विविध अभ्यासक्रमाबद्दल व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंबधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नाचे निरसन केले.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत करताना डॉ.के.बी.पाटील म्हणाले की,महाराष्ट्र शासनाने सीमा भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने सीमा भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे.सूत्रसंचालन व आभार श्री. शिवराज पाटील यांनी मांडले.