no images were found
माजी नगरसेवक संजय पवार यांची सखोल चौकशी व्हावी : शिवसेना महिला आघाडीची मागणी
कोल्हापूर : माजी नगरसेवक संजय पवार यांनी निवडणुकीत सादर केलेल्या प्रमाणपत्रात कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. व्हिडीओ गेम पार्लर शिवाय इतर उत्पनाचे स्त्रोत नसताना कोत्यावधींची मालमत्ता कशाच्या जीवावर कमविली याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. माजी नगरसेवक संजय पवार यांची चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री.सरदार बळीराम नाळे यांचेकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात म्हंटले आहे कि, कोल्हापूर शहरातील श्री.संजय मारुती पवार, माजी नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका या इसमांनी गेली अनेक वर्षे आपल्या गैरकृत्यातून कोट्यावधींची संपत्ती गोळा केली आहे. श्री.संजय पवार हे पद्मा टॉकीज चौक, कोल्हापूर येथील खासगी दुकान गाळ्यामध्ये बसून नागरिक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी यांना विविध कारणे काढून, त्यांना धमकावून हप्ते वसूल करतात. गुंडगिरीच्या भीतीतून सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, व्यापारी श्री.संजय पवार आणि त्यांच्या टोळक्यांना पैसे देवून स्वत: कर्जबाजारी होत आहेत. श्री.संजय पवार आणि त्यांच्या टोळी कडून गेली अनेक वर्षे विविध शासकीय कार्यालयात आंदोलनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना धमकावून त्यांना वेठीस धरत आहेत. प्रसिद्धी पोटी केलेल्या आंदोलनानंतर त्यात तोडपाणी करून अधिकाऱ्यांकडून पैसे वसूल करण्याचे दैनंदिन काम श्री.संजय पवार यांचेकडून होते. यामुळे श्री.संजय पवार व त्यांच्या टोळीस द्यावे लागणाऱ्या आर्थिक रसदीसाठी शासकीय कार्यालयातही भ्रष्टाचाराची टक्केवारी वाढली आहे. श्री.संजय पवार हे व्हिडीओ गेम पार्लर चालवितात. सदर व्हिडीओ गेम पार्लर मध्ये शासकीय नियम धाब्यावर बसवून लोकांना लुटण्याचे काम सुरु आहे. याठिकाणी कारवाई पूर्वीच अधिकाऱ्यांनाही धमकाविण्यापर्यंतची त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे आजतागायत याठिकाणी कोणतीही कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही. या व्हिडीओ गेम पार्लरच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीमुळे अनेकांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. श्री.संजय पवार यांचे व्हिडीओ गेम पार्लर शिवाय कोणतेही इतर आर्थिक स्त्रोत नसताना त्यांनी निवडणुक आयोगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे एक व्हिडीओ गेम पार्लरचा मालक कोट्यावधी रुपयांची मालमत्ता प्रमाणपत्राद्वारे दर्शवित आहे ही मालमत्ता गोळा केली कशी? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अनधिकृत मार्गाने, खाजगी सावकारकी, धमकावून कोट्यावधीं रुपयांची मालमत्ता कमविणाऱ्या श्री.संजय पवार यांची व त्यांच्या मालमत्तांची सखोल चौकशी करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी वर्गावर होणारा अन्याय थांबवावा. अन्यथा, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगल साळोखे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, महिला आघाडी महानगर समन्वयक श्रीमती पूजा भोर, सौ.गौरी माळतकर, सौ.पूजा कामते, सौ.मंगल कुलकर्णी, सौ.गीता भंडारी, सौ.शाहीन काझी, श्रीमती रुपाली कवाळे, सौ.सुनिता भोपळे आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.